नवजात बालकांच्या उपचार सुविधांचा पवारांकडून अचानक आढावा

नाशिक : प्रतिनिधी
अमरावती येथील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांची सुरक्षितता व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी जि. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) पाहणी केली.
यावेळी एनआयसीयूतील सुविधांचे तातडीने ऑडिट करून निदर्शनास आलेल्या त्रुटींची कोणताही विलंब न करता पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
या पाहणीदरम्यान एनआयसीयूमध्ये नवजात बालकांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा, उपकरणांची कार्यस्थिती, ऑक्सिजन व्यवस्था, विद्युतपुरवठा व बॅकअप व्यवस्था, स्वच्छता, संक्रमण प्रतिबंधक उपाययोजना, औषधसाठा, अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणार्‍या उपाययोजनांची मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी सविस्तर माहिती घेतली.
ऑडिटदरम्यान आढळलेल्या अपूर्तता व त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देताना एनआयसीयूसारख्या संवेदनशील विभागात सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही बाब प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवजात बालकांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे सुस्थितीत व कार्यरत असणे, ऑक्सिजनचा अखंड पुरवठा, वीजपुरवठ्याचा पर्यायी स्रोत, आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा तसेच संक्रमण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
एनआयसीयू व संबंधित आरोग्य सुविधांचे अग्निसुरक्षा ऑडिट (फायर ऑडिट) तातडीने करून घेण्याचे निर्देशही पवार यांनी दिले. तसेच ऑडिटमध्ये आवश्यक बाबी निदर्शनास आल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी डीपीसीअंतर्गत आवश्यक प्रस्ताव तयार करून तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या. नवजात बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ऑडिटमध्ये आढळलेल्या सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता करून एनआयसीयुमधील सेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. आवश्यक त्या बाबींसाठी फायर ऑडिट करून घेण्यात यावे तसेच डीपीसीअंतर्गत आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Pawar conducts a surprise review of neonatal care facilities.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *