शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या लेकरांच्या सभोवताली माती पूर्णतः विखुरलेली असते… शेत कामात त्यांच्या अंगाखांद्याला मातीचं लिंपण लागत. पाऊल वाटेवरून बैलगाडी नेताना रस्त्यात उडणारा फुफाटा म्हणजे मातीच्या माणसाच स्वागत करण्यासाठी उधळणारा गुलालच वाटू लागतो .असंच एक एक नातं जुळतं जातं. या सर्वां शिवाय त्याला रमत गमतं नसतं. काट्याकुट्यांची त्याला सवय होते. डोईवर रखरखत्या ऊन ओकणार्या त्या दिनकरापुढे तो वाकून दंडवत घालत काम सुरू करतो.हा भास्कर जणू त्याला आशीर्वाद देत जातो. त्याने त्याचा कामाचा उत्साह टिकून असतो. या उन्हातान्हाची त्याला कधी परवा नसते. बी जसं मातीत रुजतं तसं ते मंदपणे वाढ घेत जातं. वाढणारं पीक हळूहळू मातीत रुजून वाढू लागतं. वार्याच्या संगीतावर पीक डोलू लागते. पिकावर आलेले मोत्याचे टपोरे दाणे तेजस्वी दिसू लागता. त्याप्रमाणे बळीराजा हा धन्य होतो. शेतीमातीचा हा माणूस किती परोपकारी म्हणावा. जगाच्या भाकरीची चिंता करणारा हा बळीराजाच असतो..
ही माणसं इतकी उदार असतात की, घरात आलेला अतिथी त्यांच्यासाठी देवो भवः मानतात. बसण्यासाठी मोडका पाट आणि घरात असलंनसलं तरी जेवणाचं ताट त्याच्यासाठी तयार असतं. पाहुणचारामध्ये चहा नसेल तर शोभा कशी? दोन घटकांना दोन पाहुणे जेवतील इतकी भाकरी त्याच्या टोपलीत असते. नसले पाहुणे तर घरासमोरील दावणीला बांधलेली दूधदुभती जनावरं असतातच भाकरी खाण्यासाठी. माणसांसोबत त्याची जनावरंपण पोटभर खाऊन सुस्तावतात. मोकळ्या हाताने देणारा दानशूर हा मातीचा माणूस. घरी आलेल्या पाहुण्याला जाताना शिदोरी सोबत बांधून देत असतो. त्याला कधी वानवळा असं म्हटलं जातं. देताना त्याच्या हाताला कधीही मोजमाप नसतं. या शेतीच्या माणसाकडून कोणीही रिकाम्या हाती जाऊ नये इतकं मात्र त्याच्या शिवाराने त्याला भरभरून दिलेलं असतं. त्यावर त्याचा ऊर अभिमानाने फुलत असतो.
एकमेव शेतीमातीचा हा लेक सार्या जगाचा उदरभरण करणारा हा पोशिंदा. फार मोठी स्वप्नं त्याचे कधी असतील किंवा नसतीलही, परंतु आहे त्यात समाधान मानणारा तो असतो. कधी त्याच्या कष्टाला यश येते किंवा अपयश येते. कधी निसर्ग सोबत साथ देत नसतो. तरी तो कधी मातीची साथ सोडत नाही. चिखलात पडलेल्या पायाप्रमाणे माती त्यालाही घट्ट रोवून ठेवते तिच्यासोबत.आर्थिक स्थितीने गरीब असला, पण मनाने फार श्रीमंत असतो. मन व विचारांनी श्रीमंती लाभणारी माणसं फार क्वचित भेटतात. अशी श्रीमंती पद व पैसा यांनी प्राप्त होत नाही.तर त्यासाठी सुगंधी मातीत राहावं लागतं.स्वकष्टाच्या घामाच्या धारांतून ती श्रीमंती पाझरत जाते. कष्टाळू रक्ताच्या नसानसांतून ती आपसूकच भिनत जाते. असा सहवास शेतीमातीचा त्यांना निरंतर लाभो व त्या श्रीमंतीचा सहवास आपल्याला लाभावा. शेतीचा आणि शेतीच्या माणसांचा आडोसा प्रत्येकाला मिळावा वाटतो. या शेतीमातीच्या माणसाचा आसरा म्हणजे वटवृक्षाची छाया असते. अन् असा विसावणारा छायादार माणूस सहजच मिळाल्यावर आपणही ऋणी होतो.
रानवाटेतून फिरताना एकदा तरी असा चिखलमातीचा, शेतीमातीचा माणूस गवसला तर त्याला आदरभाव देण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभावं.
People from the agricultural land…
खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…
खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…
सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…
कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…
दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव : प्रतिनिधी तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे…