पेठरोड लिव्ह इन पार्टनर खून प्रकरणी संशयित महिलेसह अन्य दोघींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
पंचवटी : प्रतिनिधी
ज्या प्रेयसीसाठी घर सोडले तिनेच गळा आवळून खून केल्याच्या धक्कादायक घटनेचा तपास करत असताना पंचवटी पोलिसांनी या गुन्ह्यातील आणखी दोन महिला साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी महिला सोनाली राजेंद्र गायकवाड, तिच्या मदतीला असलेल्या मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात अशा तिन्ही महिला आरोपींना बुधवार, दि. 27 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी जिल्हा रुग्णालयात चक्कर आल्याचा बनाव रचणार्या सोनाली गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, गळा आवळण्याच्या या क्रूर कृत्यात आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात तिला आणखी काही जणांनी मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीने तपास करत पोलिसांनी मंदाबाई गायकवाड आणि वैशाली खरात या दोन्ही महिलांना अटक केली. अमोलचा गेम प्लॅन रचण्यात आणि हा गुन्हा लपवण्यात या दोन्ही महिलांनी सोनालीला कशी मदत केली, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. पैशांचा वाद आणि अनैतिक संबंधातून अवघ्या 15 दिवसांपूर्वी लिव्ह इनमध्ये राहण्यास आलेल्या 26 वर्षीय अमोल दांडगे याचा अत्यंत निर्घृणपणे गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ 1 च्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे. न्यायालयाने तिन्ही महिला आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने आता पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त करणे, गुन्ह्याचा मुख्य हेतू आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस निरीक्षक नितीन आंधळे आणि त्यांचे पथक घेत आहे.
Pethroad Live-in Partner Murder Case