मनमाडला विजेच्या धक्क्याने तीन मोरांचा मृत्यू

मनमाड : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या इंडियन ऑयल गॅस प्रकल्पात विजेचा धक्का लागून तीन मोरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाला याची माहिती कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोरांना ताब्यात घेतले. या घटनेने परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वादळीवारा आणि पाऊस सुरू झाल्यानंतर मोरांची इकडून-तिकडे पळापळ सुरू असताना इंडियन ऑइल या गॅस प्रकल्पातील महावितरणच्या 33 केव्ही विद्दुत वीजप्रवाहाचा धक्का बसून तीन मोर मरण पावले. यावेळी विजेचा मोठा आवाज होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबतची माहिती प्रकल्पातील अधिकार्‍यांना समजताच त्यांनी तातडीने धाव घेऊन वीज कर्मचार्‍यांना बोलावून वीजपुरवठा बंद करून मोरांना बाजूला केल्यानानंतर वीजपुरवठा सुरळीत केला. तर याची वाच्यता बाहेर होऊ नये याची दक्षता घेऊन त्यांना तेथेच प्रकल्पाच्या आवारात खड्डा करून दाबून देण्यात आल्याची चर्चा आहे.
मात्र, याबाबतची चर्चा वार्‍यासारखी पसरल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीने पानेवाडी येथील गॅस प्रकल्पात दाखल होऊन खड्ड्यात पुरलेले मोर बाहेर काढून पंचनामा करून नांदगाव येथे घेऊन गेले व मोरांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. यावेळी नांदगावचे वनपाल एस. बी. महाले, वनरक्षक दराडे, वीज वितरणचे दिलीप गायकवाड, डी. सी. जेजुरे, गोकुळ केर्‍हे आदींसह प्रकल्पातील कर्मचार्‍यांनी
परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *