अमित शाह जागतिक योग दिवस साजरा करणार समर्थ गुरुपीठावर

केंद्रीय सुरक्षा यंत्रणाकडून आढावा

नाशिक :
भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमितजी शाह जागतिक योग दिनी म्हणजेच 21 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठावर येणार असून अमित शाह यांचे हस्ते विविध उपक्रमांचा शुभांरंभ होणार असून या कार्यक्रमाच्या तयारी बाबत शनिवारी दिवसभर विविध केंद्रीय व स्थानिक सरकारी यंत्रणांनी आढावा घेतला.
एप्रिल 2022 मध्ये स्वामी सेवा मार्गाच्या करोडो सेवेकऱ्यांच्या वतीने चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ. दिकपाल गिरासे यांनी दिल्लीत अमितजी शाह यांची भेट घेऊन गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सेवामार्ग संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुमारे 10 हजार केंद्राच्या माध्यमातून करत असलेल्या अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याबाबत अमितजी यांना माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठास भेट देण्याची विनंतीही केली. सेवामार्गाच्या या विनंतीस मान देऊन शाह जागतिक योग दिनी त्र्यंबकेश्वर नगरीत समर्थ गुरुपीठावर येत आहेत.
जागतिक योग दिन तसेच सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळा मंत्री महोदय आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्यामुळे आणि महाराष्ट्राचेही अनेक मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी या सोहळ्यात हजेरी लावणार असल्याने,याबाबत तयारीचा आढावा आज विविध यंत्रणांनी घेतला.केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक दर्शनलाल गोला, राकेश कुमार, वरिष्ठ अधिकारी पारस नाथ, योगेश कुमार, स्वप्नील पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कीर्तिका नेगी,त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, मंडळाधिकारी अनिल रोकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे,पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफाळ यांचेसह अनेक अधिकारी कर्मचारी हा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ दिकपाल गिरासे व इतर संबंधित सेवेकऱ्यांनी मुख्य कार्यक्रम स्थळ, पार्किंग, निवास व्यवस्था, व्यासपीठ, बैठक व्यवस्था व इतर छोटया मोठया गोष्टींची माहिती सर्वाना दिली.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ,ना.दिलीप वळसे पाटील, ना. बाळासाहेब थोरात, ना. आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
आज गुरुपीठात आलेल्या
सर्व अधिकाऱ्यांचा प पू गुरुमाऊली यांचे हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *