नाशिक

हिंदू-मुस्लिम-बौद्ध ऐक्याचे प्रतीक पीरसाईबाबा यात्रोत्सव

शिरवाडे वाकद परिसरात विशेष आकर्षण; महापूजेसह जागरण, तमाशा

लासलगाव : वार्ताहर
शिरवाडे वाकद येथील हिंदू-मुस्लिम-बौद्धधर्मीय ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरसाईबाबांचा यात्रोत्सव 11 ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. सर्वधर्मीय एकोप्याचे दर्शन घडविणारी ही यात्रा परिसरात विशेष आकर्षण ठरते.
हिंदू- मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन, तमाशा कलावंतांची कलापूर्ण मिरवणूक व हजेरी हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. पीरसाईबाबा हे हिंदूंचे की मुस्लिमांचे दैवत असा वाद न घालता सर्वधर्मीय ग्रामस्थ एकोप्याने यात्रोत्सव साजरा करतात. पीरसाईबाबा ग्रामदैवत तसेच सर्व जातीधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराची देखभाल व पूजाअर्चा मुस्लिम समाजाकडे आहे. सन 1965-66 च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठामंत्री तल्यारखान यांनी शिरवाडे गावाला भेट देऊन येथे असलेल्या सर्वधर्मीय ऐक्याचे कौतुक केले होते.
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, संदलच्या दिवशी गावातील प्रत्येक घरी नवीन गव्हाचे पीठ, गूळ व तूप यापासून ‘मलिदा’ तयार केला जातो आणि तो प्रसाद म्हणून पीरसाईबाबांना अर्पण केला जातो. निफाड तालुक्यात नैताळे पाठोपाठ मोठी भरणारी ही यात्रा आहे. पूर्वी येथे टांगा शर्यती होत असत. कालौघात त्या बंद झाल्या असल्या तरी खेळणी विक्रेते, रहाटपाळणे व मिठाई विक्रेते मोठ्या प्रमाणावर यात्रेत सहभागी होतात. ही यात्रा पूर्णपणे करमुक्त असून, ग्रामपंचायत दुकानदारांकडून कोणताही कर आकारत नाही. यात्रेनिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक व चाकरमानी गावी येतात. पूर्वी यात्रेत पशुबळी देण्याची प्रथा होती. मात्र, ग्रामस्थ व मुंबई येथील बौद्धाचार्य काशीनाथ धनराव यांच्या पुढाकाराने, तसेच दलित ग्रामस्थांच्या सामंजस्याने ही प्रथा बंद करण्यात आली आहे. नागरिकांचा व विक्रेत्यांचा वाढता प्रतिसाद पाहता पूर्वी तीन दिवस चालणारी यात्रा आता चार दिवस भरविण्यात येत आहे.
यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.6) दुपारी चारला नवरदेव हळद लावणे व घटी बसणे कार्यक्रम झाला. रात्री 9 ते 12 पर्यंत पोपटराव कदमसह वाघे मंडळ, निळखेडे यांचे जागरण, शनिवारी (दि. 7) रात्री मच्छिंद्रभाऊ जगतापसह वाघे मंडळ, उजनी यांचे जागरण, रविवारी (दि. 8) खंडू भगतसह वाघे मंडळ, मुखेड, तर सोमवारी (दि. 9) भाऊसाहेब कांगणेसह वाघे मंडळ, देवगाव फाटा यांचे जागरण, मंगळवारी (दि. 10) किसन चव्हाणसह वाघे मंडळ, मुखेड यांचे जागरण, बुधवारी (दि. 11) सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात भागवत ब्रास बँड, मुखेड हे मुख्य आकर्षण असेल.
त्यानंतर रात्री नऊला पीरसाईबाबांची महापूजा होईल. गुरुवारी (दि. 12) दुपारी दोनला काठी मिरवणूक, सायंकाळी 5.30 ला बारागाड्या ओढणे हा कार्यक्रम होणार आहे. नवरदेव म्हणून विकास फुलचंद पवार सहभागी होणार आहेत. याच दिवशी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पोपट कदमसह वाघे मंडळ, निळखेडे यांचे लंगरी जागरण होईल.
शुक्रवारी (दि. 13) रात्री 9 ते 12 दरम्यान सविता राणी पुणेकरसह लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा रंगणार आहे. शनिवारी (दि. 14) सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत तमाशा कलावंतांची हजेरी होऊन यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यात्रोत्सवास परिसरातील भाविक, दुकानदार तसेच तमाशारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व यात्रोत्सव समितीने केले आहे.

Pir Sai Baba Yatra Festival, a symbol of Hindu-Muslim-Buddhist unity

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago