बदलत्या वातावरणामुळे ऊन, वारा, पाऊस या तिहेरी संकटाचा धोका
मालेगाव : नीलेश शिंपी
द्राक्षबागांना बदलत्या वातावरणामुळे एकीकडे ऊन, तर दुसरीकडे अचानक येणारे वार्य़ाचे झोत आणि अनियमित पावसाचे फटके या तिहेरी संकटाने मोठा धोका निर्माण होता. यावर उपाय म्हणून तालुक्यातील टेहरे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नरेंद्र शेवाळे यांनी द्राक्षबाग वाचवण्यासाठी बागेवर प्लास्टिक आच्छादन करून या आव्हानावर प्रभावी मात केली आहे. शेवाळे यांनी केलेला अभिनव प्रयोग सध्या शेतकरी वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
गत काही वर्षांपासून वातावरणातील अनिश्चितता वाढली आहे. थंडी, दव, अनियमित पाऊस आणि जोरदार वारा यामुळे द्राक्ष झाडांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. द्राक्षपीक सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणात्मक तंत्रज्ञान आवश्यक असल्याची जाणीव झाल्यानंतर शेवाळे यांनी आपल्या बागेत प्लास्टिक आच्छादनाचा प्रयोग करण्याचे ठरवले. यासंदर्भात त्यांनी अभ्यास करून द्राक्षबागेला संपूर्ण संरक्षित ठेवण्यासाठी एका एकरावर साधारण तीन लाख रुपये खर्च करून प्लास्टिक आच्छादन टाकले. यामुळे रात्रीच्या दवबिंदूंमुळे होणारी बुरशी, थंडीच्या लाटेने होणारा पिकाचा ताण, या सर्वांपासून बागेचे रक्षण झाले. प्लास्टिक आच्छादनामुळे बागेतील सूक्ष्म वातावरण नियंत्रित राहिले. उष्णतेचा आणि आर्द्रतेचा समतोल साधला गेला, ज्यामुळे द्राक्षाच्या वाढीला योग्य अनुकूल परिस्थिती मिळाली.
दुपारच्या अचानक सरी, गारपीट, वादळ या अलीकडच्या काळातील समस्या द्राक्षबागांसाठी सर्वांत मोठे संकट मानले जाते. मात्र, या संरक्षित आच्छादनामुळे शेवाळे यांच्या बागेतील घड खराब होण्याचे प्रमाण कमी झाले. उघड्या बागेपेक्षा या बागेत नुकसान कमी असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या अनिश्चिततेशी झुंज देणार्या द्राक्ष उत्पादकांसाठी हा प्रयोग दिशादर्शक ठरणारा आहे.
चांगले दर मिळण्याची शक्यता
उच्च खर्च असला तरी उत्पादनाची सुरक्षा, गुणवत्तापूर्ण घड आणि बाजारपेठेत चांगले दर मिळण्याची शक्यता या सर्वांचे मिळून येणारे आर्थिक परिमाण शेतकर्यांना याकडे आकर्षित करत आहे. टेहरे येथील या उपक्रमामुळे संरक्षित शेतीच्या संकल्पनेला तालुक्यात नवे बळ मिळाले आहे. वाढत्या वातावरणीय जोखमींच्या काळात शेवाळे यांचा हा प्रयोग द्राक्ष उत्पादकांसाठी प्रभावी पर्याय ठरू शकतो, असा विश्वास शेतकर्यांकडून व्यक्त केला जात आहे.