भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकारी ठार

सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला

सप्तशृंगगड : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलिसांवर एका भरधाव कारने घाला घातला आहे. गडावर बंदोबस्त बजावत असताना एका अनियंत्रित सियाज कारने कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल आणि नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे
रविवार (दि. 18) मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास अभोणा वळण रस्त्यावरील (टी-पॉइंट) परिसरात हा अपघात घडला. नवरात्रोत्सवातील गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम सुरू असताना, वणीकडून सुसाट आलेली पांढर्‍या रंगाची सियाज कार (एमएच 12एमएल 7747) अनियंत्रित झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि भाविकांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालक वाहन जागेवरच सोडून फरार झाला.
अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड आणि पोलीस सचिन राऊत हे तीन कर्मचारी, तसेच कपिल साळी, मोरेश्वर पाटील, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव व राधाबाई गावित हे सात भाविक गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना प्रथमतः वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सप्तशृंगगडासारख्या पवित्र ठिकाणी पोलिसांच्या जीवावर बेतल्यामुळे नागरिक व भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Police officer killed in hit-and-run with speeding car

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *