इगतपुरीत बनावट पावडर, धोकादायक साहित्य जप्त
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहरात बनावट कुल्फी तयार करणार्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात कुल्फी तयार करण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 15 सफेद ‘गोबिंदा’ कंपनीचे पोस्टर कलरचे डबे, दोन चॉकलेट रंगाचे डबे, एक इसेन्सची बाटली तसेच कुल्फी बनविण्याचे विविध साहित्य जप्त केले. प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, पाण्यात पोस्टर कलर मिसळून त्याला दुधाचा रंग दिला जात होता. त्यानंतर त्या बनावट दुधात चॉकलेट कलर आणि इसेन्स टाकून कुल्फी तयार केली जात होती. बनावट कुल्फ्या तालुक्यातील ग्रामीण भागात, शहरात तसेच चालत्या रेल्वेगाड्यांमध्येही विकल्या जात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोस्टर कलर आणि रासायनिक इसेन्स वापरून तयार केलेल्या कुल्फ्या आरोग्यास घातक ठरू शकतात. जलद नफा कमावण्याच्या नादात संबंधितांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
याप्रकरणी विनोद प्रकाश कुशवाह या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली असून, तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या एका लिटर दुधातून साधारण 2,500 कुल्फ्या तयार केल्या जात होत्या. एक कुल्फी तीन रुपयांना विक्रेत्यांना दिली जात असून, पुढे त्यावर कमिशन लावून बाजारात विक्री केली जात होती. या बनावट कुल्फ्या जागीच नष्ट केल्या. या साखळीत कमिशन घेणारे आणि वितरण करणारे नेमके कोण आहेत, याचाही तपास करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी कारखान्यात असलेल्या सर्व पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, या व्यक्तीकडे कारखाना चालविण्यासाठी लागणारा परवाना व शॉप अॅक्ट परवानाही आढळून आला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्याचा अहवाल येत नाही व परवाने काढून घेत नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस संशयितास दिलेली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे नीलेश देवराज, विजय रुदे, महेंद्र गवळी आदींची पोलीस टीम तपास करत आहे.
कारवाई होईल का?
इगतपुरीत उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक हॉटेलमध्ये बनावट मावा वापरून बर्फी, पेढे व अन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. यावरही कारवाई होईल का? अशी चर्चा नागरिकांत होत आहे.