तोतया पोलीस चहा पिण्यास आला अन् जाळ्यात अडकला

सिडको : विशेष प्रतिनिधी
आंबिवली इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास सापळा रचून सराईत इराणी चोरटा जेरबंद करण्यात आला असून, त्याच्याकडून 10 गुन्ह्यांची उकल करत सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा यांनी केली.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिराजवळ, दीपनगर, शिवाजीनगर येथे जुलैखा नजीर शेख (74) या पायी घरी जात असताना अज्ञात इसमांनी
स्वतःला पोलीस असल्याचे सांगून 15 ग्रॅॅम वजनाची सोन्याची चेन फसवणुकीने लंपास केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत होते. नाशिक शहरात पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन वाढविण्यात आले असताना, काही आरोपी बनावट पोलीस बनून वयोवृद्ध नागरिकांना गाठत होते. पुढे तपास सुरू आहे, खून झाला आहे, नाकाबंदी आहे, असे सांगून दागिने पिशवीत ठेवण्यास सांगत हातचलाखीने ते लंपास केले जात होते. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
नाशिकमधील इंदिरानगर, उपनगर आणि नाशिकरोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना संशयिताचा फोटो मिळाला. गोपनीय बातमीदारांकडून तो सराईत इराणी टोळीतील सदस्य असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपीचे नाव संजू इराणी (रा. आंबिवली, जि. ठाणे) असे निष्पन्न झाले. आंबिवली येथील इराणी गल्ली हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला भाग असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगली. आरोपी पहाटे 4 ते 5 दरम्यान आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ चहा पिण्यास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. अटक आरोपी जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी (वय 53, रा. मंगलनगर, अटाळी, ता. कल्याण, जि. ठाणे) याने चौकशीत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्त मंदिराजवळील चोरीची कबुली दिली. पुढील तपासात त्याने इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 10 ठिकाणी साथीदारांसह बनावट पोलीस बनून दागिने लंपास केल्याची कबुली दिली.
चोरीतील काही दागिने आरोपीने अहमदाबाद (गुजरात) येथील माणेक चौक परिसरात विक्री केले होते. पोलिस पथकाने तेथे जाऊन दागिने हस्तगत केले. तसेच काही दागिने आंबिवली येथे लपवून ठेवलेले आढळून आले. एकूण 10 गुन्ह्यांची उकल करत सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप यांनी सहभाग घेतला.

An impersonator policeman came to drink tea and got caught in a trap.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *