कोलकाता : प्रतिनिधी
♦ तृणमूलमध्ये मोठी फूट
♦ 60 आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन
♦ अभिषेक यांच्या घरी ईडी छापेमारी
♦ ममता बॅनर्जींची दुहेरी कोंडी
पश्चिम बंगालच्या राजकारणात बुधवारी (दि. 3) एकाच वेळी अनेक धक्कादायक आणि मोठ्या घडामोडी समोर आल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विधानसभेतील सत्तासमीकरणांपासून ते थेट तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाच्या अंतर्गत रचनेला आणि नेतृत्वाला हादरा देणारे नाट्यमय घटनाक्रम एकामागून एक घडत आहेत. यात प्रामुख्याने 60 आमदारांचा स्वतंत्र गट, पक्षावरच दावा, विरोधी पक्षनेतेपदाची नवी समीकरणे, कोलकाताच्या महापौरांचा राजीनामा आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरू केलेली धडक कारवाई यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल विधानसभेत एक मोठा राजकीय बदल पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. ऋतब्रत बनर्जी यांना तृणमूल काँग्रेसच्या सुमारे 60 हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांची विधानसभेत नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या या मोठ्या गटामुळे आणि अंतर्गत पाठिंब्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षावरील ममता बॅनर्जी यांची पकड सैलावली असून, राज्याच्या भावी राजकारणात याचे मोठे पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत.
याच मोठ्या राजकीय घडामोडींदरम्यान, तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हकीम यांनी थेट पक्षाच्या सर्वोच्च नेत्या ममता बनर्जी यांच्यासमोरच आपला राजीनामा सादर केला. तृणमूलमधील हा अंतर्गत असंतोष आणि महापौरांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा यामुळे पक्ष संघटना आणि प्रशासकीय पातळीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे हे राजकीय नाट्य सुरू असतानाच, दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनीही तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. कथित कोळसा घोटाळ्याशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी थेट तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अभिषेक बनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. ईडीच्या या धडक कारवाईमुळे आणि चौकशीच्या सत्रामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ममता यांच्याकडून या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
Political earthquake in West Bengal