सिन्नर-निफाड रस्त्यावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

अपघातांची मालिका सुरूच, बांधकाम विभागावर नागरिकांचा रोष

गांवकरी इम्पॅक्ट

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर-निफाड राज्यमार्गावरील उकाडे मळ्याजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा जीवघेणा ठरत असल्याने यासंदर्भात दै. गांवकरीने आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून, या राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे.
दरम्यान, सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, नगरसेवक पंकज जाधव यांच्या पुढाकारातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती.
सिन्नर शहराजवळील उकाडे मळ्याजवळ गारे एंटरप्रायझेससमोर मुख्य रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत होता. गेल्या महिनाभरात या ठिकाणी सहा ते सात अपघात घडले असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
यासंदर्भात दैनिक गांवकरीने आवाज उठवत वृत्त प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. याशिवाय, नगराध्यक्ष उगले, उपनगराध्यक्ष देशमुख व स्थानिक नगरसेवक पंकज जाधव यांनी सकारात्मक पाठपुरावा केल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दि. 11 रोजी उकाडे मळ्याजवळील जीवघेण्या खड्ड्यासह सिन्नर न्यायालयाजवळील व पिंप्रीनाका परिसरातील उर्मी अमृततुल्य समोरील धोकेदायक खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Pothole on Sinnar-Nifad road is becoming life-threatening

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *