नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सार्वजनिक हित आणि रेल्वे हित यांचा सुंदर संगम साधत रेल्वे मार्गालगत सर्वसमावेशक सुरक्षा कुंपण उभारणीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. इगतपुरी, भुसावळ, बडनेरा आणि भुसावळ, खंडवा या महत्त्वाच्या मार्गांवर संपूर्ण लांबीमध्ये सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन आहे. हे मार्ग दाट लोकवस्ती व संवेदनशील भागांतून जात असल्याने अनधिकृत रूळ ओलांडणे व अतिक्रमणाच्या घटनांमुळे गंभीर अपघातांची शक्यता निर्माण असल्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कुंपण योजना दीर्घकालीन व संरचित उपाय आहे. रेल्वेमार्गांवर अनधिकृत प्रवेश रोखून अनेक प्राणघातक अपघातांचे मूळ कारण असलेल्या असुरक्षित प्रवेशाला आळा घालणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
रेल्वेमार्गावर भटक्या जनावरांच्या प्रवेशामुळे होणार्या अपघाताच्या घटना केवळ जनावरांसाठीच नव्हे तर रेल्वे संचालन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही गंभीर धोका निर्माण करतात. अशा घटनांमुळे अचानक ब्रेक लावावे लागणे, डब्यांचे नुकसान, सेवा विस्कळीत होणे आणि टोकाच्या परिस्थितीत रुळांवरून घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
संवेदनशील भागांमध्ये सलग सुरक्षा कुंपण उभारल्यामुळे जनावरांचा अनधिकृत प्रवेश प्रभावीपणे रोखला जात आहे. त्यामुळे पशू गाडीखाली येण्याच्या घटनांमध्ये घट, मालमत्तेचे संरक्षण, वेळेची बचत आणि अधिक सुरक्षित व सुरळीत रेल्वे वाहतूक सुनिश्चित होत आहे.
भुसावळ विभागाने मनुष्य रुळाखाली येण्याच्या आणि रेल्वेवरील पशुधन अपघात प्रवण स्थळांची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत. अपघातांच्या आकडेवारी व प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे संवेदनशील ठिकाणी शक्य असल्यास भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व अधिकृत मार्ग उपलब्ध होत असून, रेल्वे संचालनही अखंडित राहते. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व सुरक्षा निकषांवर तपासून योग्य ठिकाणी कामे हाती घेतली जात आहेत. सध्या विभागात 160 ठिकाणी भुयारी मार्ग कार्यान्वित असून, सुरक्षित संपर्क व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.
सुरक्षा कुंपणास पूरक म्हणून खालली संरचनात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत : उच्च जोखीम भागांत कायमस्वरूपी सीमा भिंती, स्थानकांवर पादचारी पूल, सरकते जिने व लिफ्ट, प्लॅटफॉर्म उंची वाढवून ट्रेनप्लॅटफॉर्ममधील अंतर कमी करणे. या उपायांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांसाठी सुरक्षित व सुलभ प्रवासाची हमी मिळते आणि रूळ ओलांडण्यासारख्या धोकादायक मार्गांना आळा बसतो.
सुरक्षा कुंपणाचे प्रमुख फायदे
♦ अनधिकृत रूळ ओलांडणे व अतिक्रमणास प्रतिबंध
♦ अपघाती मृत्यू व जखमींची संख्या कमी
♦ रेल्वे वाहतुकीतील अचानक अडथळ्यांना प्रतिबंध
♦ वेळेचे पालन व कार्यक्षमतेत वाढ
♦ रेल्वे कर्मचार्यांवरील मानसिक आघातात घट
♦ रेल्वे संचालनाचे संरक्षण म्हणजेच मानवी जीवनाचे संरक्षण. अखंड, सुरक्षित रेल्वे वाहतूक ही समाजाच्या सुरक्षिततेशी थेट निगडित आहे.
Central Railway to erect security fence along railway tracks