चंपाषष्ठीपासून प्रारंभ; बारागाड्या ओढणे खास आकर्षण
ओझर : वार्ताहर
संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रांपैकी जनतेचे आकर्षण असलेली ओझर येथील खंडेराव महाराजांची यात्रा सर्वांत मोठी यात्रा असून, या यात्रेचा प्रारंभ चंपाषष्ठीला दि. 26 रोजी होत आहे. ही यात्रा पाच दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते.
ओझर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा पुलाजवळील खंडेराव महाराज यांच्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाचे खास आकर्षण असते. बारागाड्या ओढणे पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील बारागाड्या असतात. त्यामध्ये देवाचा गाडा प्रथम असतो. त्यानंतर वस्ती, वाड्यांतील गाड्यांचा
समावेश असतो.
यात्रेच्यावेळी देवाची सेवा करण्याचा मान वेगवेगळ्या लोकांना आहे. त्यात भगत, चोपदार, घोडेवाले, पालखीवाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई हरदास शिंगवाले, वाघोजी यांचा समावेश आहे. या यात्रेत बारागाडे मिरवणुकीने यात्रा मैदानावर आणले जातात. मिरवणुकीच्या वेळी मल्ल कसरत करतात. दरम्यान, देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. भाविकांकडून भंडार्याची उधळण करीत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा जयघोषात घोडा बारागाड्या ओढून नेतो. बारागाड्या ओढण्यापूर्वी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी व मानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते. खंडेराव महाराजांची यात्रा शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पाडावी, असे आवाहन ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्यासह यात्रा कमिटीने
केले आहे.