एमआयडीसी पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह

बारागावपिंप्रीत केले वधू-वरांच्या पालकांचे प्रबोधन

सिन्नर : प्रतिनिधी
मुलगी अल्पवयीन असतानाही तिचा बालविवाह करण्याचा प्रयत्न सिन्नरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी हाणून पाडला. बारागावपिंप्री येथील या घटनेत एमआयडीसीच्या पोलीस अधिकार्‍यांनी शनिवारी (दि.22) वधू-वरांच्या नातलगांचे प्रबोधन करत हा विवाह थांबवला. यादरम्यान पोलिसांनी बालकल्याण समिती व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अल्पवयीन मुलीचे संरक्षण व समुपदेशनाची कार्यवाही तातडीने करण्यात आली.
तालुक्यातील बारागावपिंप्री येथे एका अल्पवयीन मुलीचा पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्याची तयारी सुरू आहे, अशी गोपनीय माहिती एमआयडीसी सिन्नर पोलिसांना प्राप्त झाली होती. ही माहिती खात्रीशीर असल्याचे आढळताच पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, उपनिरीक्षक राजू पाटील, हवालदार प्रशांत वाघ, सागर गिते, प्रमोद भोये यांच्या पथकाने बारागावपिंप्री येथे घटनास्थळी धाव घेतली. तेथे विवाहाची तयारी सुरू होती. वधू – वरासह वर्‍हाडी मंडळी उपस्थित होते. पोलिसांनी तत्काळ सदर उपस्थितांना समज देत विवाहाची प्रक्रिया थांबविली. वधूचे शाळेचे दाखले, आधार कार्डाची तपासणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे आढळून आले. यासंदर्भात पोलिसांनी नागरिकांना विवाहासाठी कायद्यानुसार मुलीचे किमान वय 18 व मुलाचे 21 वर्षे आवश्यक असल्याचे सांगितले. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावणे बेकायदेशीर असल्याबाबत मार्गदर्शन केले.

बालविवाह कायद्याने गुन्हा

कोणत्याही प्रकारचा बालविवाह आयोजित करणे, प्रोत्साहन देणे किंवा त्यात सहभागी होणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *