बक्षिसाची रक्कम गरजू विद्यार्थ्यांना

हवालदार दीपक निकम यांचे औदार्य

सिडको : प्रतिनिधी
उत्कृष्ट पोलीस कामगिरीबद्दल मिळालेल्या रोख बक्षिसाचा वैयक्तिक वापर न करता ती समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा आदर्श अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक निकम यांनी घालून दिला आहे. विविध कामगिरीबद्दल प्राप्त झालेली 51 हजार रुपयांची बक्षिसाची संपूर्ण रक्कम त्यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी अर्पण केली.
गेल्या पाच वर्षांत गुन्हे उघडकीस आणणे, तपासातील उल्लेखनीय कामगिरी आणि विविध विशेष मोहिमांतील योगदानाबद्दल वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडून निकम यांना वेळोवेळी रोख बक्षिसे देण्यात आली होती. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या संपूर्ण रकमेचा उपयोग सिडको येथील पडसाद कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला. यामध्ये शालेय पाठ्यपुस्तके, व्हाइट बोर्ड, शैक्षणिक साहित्य तसेच अन्य आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना निकम यांनी खून, घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, अमली पदार्थांविरोधातील कारवाया, अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध तसेच निवडणूक काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्येही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेला गौरव म्हणून 1 मे 2026 रोजी त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

नाशिक शहर पोलीस दलात 17 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या दीपक निकम यांनी क्यूआरटी कमांडो फोर्समध्ये तब्बल दहा वर्षे काम केले आहे. कुंभमेळ्याचे नियोजन, विविध बचाव मोहिमा तसेच डोंगराळ भागात अडकलेल्या युवक-युवतींची सुखरूप सुटका, अशा अनेक धाडसी मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

कोरोना महामारीच्या काळात निकम यांनी अनेक गरजू कुटुंबांना
स्वतःच्या खर्चातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तसेच अपघातग्रस्त आणि मृतांच्या नातेवाइकांना विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठीही त्यांनी मदतीचा हात दिला.

 

Prize money for needy students

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *