संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या वतीने केलेल्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचारकी भाषण करुन विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या नऊ वर्षांत म्हणजे २०१४ नंतरच देशाचा खर्या अर्थाने विकास झाला. त्याआधीच्या दहा वर्षात देशात विकास नाही, तर केवळ भ्रष्टाचाराच झाल्याचे त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितले. त्यांनी कोटी कोटी शब्दांचा अनेकदा उल्लेख केला. निवडणूक प्रचारासाठी सरकारने केलेली कामगिरी सांगितली जाते आणि विरोधक कूचकामी असल्याचे सांगितले जाते. याकडेच मोदींनी लक्ष वेधून लोकांचे लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांत दोन-तीन मुद्दे चर्चेत आहेत. ते दाबून टाकण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार, माजलेला दहशतवाद आणि देशाची अधोगती यावरच भर दिला. काही गोष्टी त्यांनी वैयक्तिक घेतल्या विरोधक आपल्यावर सातत्याने टीका करुन आपल्याला शिव्या देत आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांना काहीच काम नाही. विरोधकांनी कितीही टीका केली आणि शिव्या दिल्या, चिखलफेक केली, तरी आपल्याला देशातील कोटी कोटी लोकांचा पाठिंबा असून, तेच आपले सुरक्षाकवच असल्याचे सांगत देशातील जनतेचा ‘मोदीवर’ भरवसा असल्याचा खास त्यांनी केला. या भाषणातील अनेक मुद्दे यापुढे भाजपाच्या जाहीर सभांमधून उपस्थित केले जातील आणि लोकसभा निवडणूक प्रचारातही याच मुद्यांची उजळणी नव्याने केली जाईल. मोदी सरकारने आणलेल्या योजनांचा लोकांना लाभ होत आहे, याविषयी शंका नाही. पण, काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले जात आहे, हेही तितकेच सत्य आहे. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचे मोदी वारंवार सांगत आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षांची भूमिका त्यांनी मान्य केली. प़न विरोधी पक्षांनी केवळ टीका, शिवीगाळ आणि चिखलफेक करुन ९ वर्षे वाया घालविण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. अर्थात, विरोधकांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांना त्यांनी बगल देत कोटी कोटी लोकांसाठी सरकारने आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपा लागला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने मोदींनी लोकसभेत भाषण करुन प्रचाराचा शुभारंभ केला, असे म्हणता येईल. अर्थसंकल्प सादर करताना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतानाही निर्मला अर्थमंत्री सीतारामन असेच प्रचारकी भाषण करुन विरोधकांच्या शिडातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
काँग्रेसवर निशाणा, पण…
बीबीसीची ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ हा माहितीपट, अदानी सनूहातील कंपन्यांच्या समभागांच्या बाजारमूल्यांविषयी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक सल्लागार कंपनीने प्रसिध्द केलेला एक अहवाल आणि चीनच्या घुसखोरीविषयीचा एक अहवाल यावर सरकार किंवा नरेंद्र मोदी काहीच बोलायला तयार नाहीत. मात्र याच मुद्यांचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांनी काँग्रेस राजवटीतील भ्रष्टाचार, दहशतवाद या मुद्यांना हात घातला. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचीही त्यांनी अप्रत्यक्ष दखल घेतली. माहितीपट, अदानी, चीनची घुसखोरी हे मुद्दे भाजपा आणि मोदींसाठी डोकेदुखीचे आहेत. यावर देशात चर्चा सुरू असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची चर्चा होत आहे. हेच मुद्दे निरस्त करण्यासाठी २००४ ते २०१४ हे देशाच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अर्थात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांवर प्रथमच भाष्य केले, असे काही नाही. पण, काँग्रेसची कारकीर्द हेच भाजपा आणि मोदींसाठी भांडवल आहे. सन २००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. या दहा वर्षात महागाई दुहेरी आकड्यांत गेली. काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. तंत्रज्ञान वाढत असताना टुजी घोटाळा झाला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत भ्रष्टाचार झाला. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ झाला. कोळसा घोटाळा झाला. असे अनेक घोटाळे झाल्याचे लोकांना माहिती आहे. पण, तेच ते उगळण्याचे काम भाजपा आणि मोदी करत आहेत. पण, त्याआधी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था सावरली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची खबर सरकारला फार उशिरा कळली. त्यानंतर वाजपेयीच पंतप्रधान असताना डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. (कारगिल आणि संसदेवरील हल्ल्याचे शिल्पकार म्हणजे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे नुकतेच निधन झाले.) इतकेच काय, तर खुद्द मोदी पंतप्रधान असताना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. अशा काही घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचा प्रचारतंत्राचा एक भाग असला, तरी सत्य नाकारता येत नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसादही भाजपाची डोकेदुखी वाढविणारा आहे. या यात्रेत सहभागी झालेले लोक १४० कोटींपैकीच होते. हेही विसरुन चालता येणार नाही. काश्मीरमधील लाल चौकात राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज फडकवल्याची दखल घेऊन मोदींना घ्यावी लागली. आपणही दहशतवाद्यांना न घाबरता लाल चौकात यात्रा काढून राष्ट्रध्वज फडकवला होता. हे त्यांना सांगावे लागले. विरोधकांचे मुद्दे निरर्थक ठरविताना त्यांनी १४० कोटी लोकांचे सुरक्षाकवच असल्याचा दावा प्रचारकी थाटातच केला.
कोटी कोटींची भाषा
भारताची लोकसंख्या १४० कोटी झाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे. लोकसंख्या १३५-१३८ कोटींच्या घरात असतानाही ते सतत १३० कोटी लोकसंख्येचा उल्लेख करत असायचे. आता त्यांनी १४० कोटींवर भर दिला आहे. कोटी कोटी लोकांसाठी आणलेल्या योजनांचे त्यांनी पाढे वाचले. देशातील सुमारे ८० कोटी गरीब लोकांना मोफत धान्य वाटप केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. सुमारे ९ कोटी लोकांना मोफत गॅसचा फायदा झाला. आयुष्मान भारत योजनेमुळे दोन कोटी लोकांचा जीव वाचला. तीन कोटी लोकांना आवास योजनेचा लाभ झाला. कोटी कोटी आकडेवारी मांडत देशातील १४० कोटी लोकांचा आपल्यावर विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. या १४० कोटी लोकांचे सुरक्षाकवच आपल्याला लाभले आहे. ते विरोधकांना भेदता येणार नाही, असे सांगत त्यांनी आत्मस्तुतीही करवून घेतली. मूळात प्रश्न असा आहे की, १४० कोटी लोक मोदी किंवा भाजपाच्या पाठीशी असतील, तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत विरोधी पक्षांचाच काय, तर अपक्ष उमेदवारही औषधालाही निवडून यायला नको. इतकेच काय, तर विरोधी पक्षांचे अस्तित्वही राहणार नाही. लोकशाहीची जननी भारत आहे, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे येत्या काळात भाजपा हाच एकमेव पक्ष राहणार असल्याचे सांगायचे. लोकशाहीत विरोधी पक्षांना महत्व आहे, हे मान्यही करायचे पण हेच विरोधी पक्ष केवळ टीका करणारे, शिव्या देणारे आणि चिखलफेक करणारे आहे, असेही म्हणायचे. मूळात १४० कोटी लोकांमध्ये विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आहेत आणि सर्वच्या सर्व लोक भाजपा किंवा मोदींच्या पाठीशी आहेत, असे काही नाही. देशात ८५ टक्के हिंदू आहेत. पण, सर्वच हिंदू हिंदुत्ववादी भाजपा किंवा हिंदू संघटनच्या कार्यात गुंतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या बाजूने नाहीत, हे अनेकदा सिध्द झाले आहे. पण, तशी वातावरण निर्मिती करुन विरोधकांना किंमत द्यायचीच नाही. हे भाजपा आणि मोदींनी ठरवून टाकले आहे.
नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…