दिंडोरीजवळ कारवायांत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा, आयशर, ट्रॅव्हल्स बस ताब्यात; दोघांना अटक

दिंडोरी : प्रतिनिधी
गुजरात राज्यातून नाशिकच्या दिशेने येणार्‍या अवैध आणि प्रतिबंधित गुटख्यावर दिंडोरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत एकूण 49 लाख 94 हजार 315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुजरातहून आयशर ट्रकमधून ( एमएच 48 सीबी 2073) बंदी असलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू नाशिककडे नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी चाचडगाव टोलनाक्याजवळ सापळा लावला. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ट्रक रोखून पाहणी केली असता, त्यात 12 लाख 35 हजार 520 रुपयांचा विमल पानमसाला, 1 लाख 14 हजारांची तंबाखू आणि 10 लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण 23 लाख 49 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक जसवंतसिंग सुभाषचंद्र (वय 25, रा. कठुआ, जम्मू-काश्मीर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार साबळे, कहाटे, पोलीस शिपाई भामरे व होमगार्ड भरसट यांनी केली.
दुसर्‍या घटनेत, गुजरातहून एका ट्रॅव्हल्स बसमधून (एआर 20 ए 5370) गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, हवालदार धुमाळ, पालवी, मोरे व पानसरे यांच्या पथकाने नाशिक-पेठ रस्त्यावरील आशेवाडी शिवारात सापळा रचला. मंगळवारी (28 जुलै) पहाटे 3.20 च्या सुमारास ट्रॅव्हल्स रोखून डिकीची झडती घेतली असता, त्यात रजनीगंधा, तुलसी, हिरा पानमसाला व रॉयल 717 तंबाखू असा 1 लाख 44 हजार 795 रुपयांचा साठा व 25 लाख रुपये किमतीची बस, असा एकूण 26 लाख 44 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक महेश दत्तू सूर्यवंशी (वय 38, रा. बलसाड, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. हा माल नाशिक येथील नथनी आमेर अनिस याने मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. हवालदार हरिश्चंद्र पालवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Property worth ₹50 lakh seized during operations near Dindori.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *