नीट पेपरफुटीप्रकरणी नाशिकमध्ये धरणे आंदोलन

’राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा’

नाशिक : प्रतिनिधी
नीट पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट-युजी 2026) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत, फेरपरीक्षा घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीप्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे आदी उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मिहिर गजबे यांनी, पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून, अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबवावा, अशी मागणी केली.
आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या निवेदनानुसार, नीट-युजी 2026 पेपरफुटीमुळे देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचा आर्थिक, तसेच मानसिक संघर्ष वाया गेल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

प्रमुख मागण्या
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
नीटची फेरपरीक्षा तत्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी.
सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकार प्रतिबंध) कायदा, 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी.
राधाकृष्णन समितीच्या शिफारशी लागू करून नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सोपवावी.
पेपरफुटीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण रोखण्यासाठी आणि शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा.

Protest in Nashik over NEET paper leak

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *