विद्यार्थ्यांचा डीबीटी निधी रखडला
नाशिक : प्रतिनिधी
प्रलंबित डीबीटी निधीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता आदिवासी विकास आयुक्तालयासमोर भरपावसात ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त दिगंबर चव्हाण यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेंंतर्गत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2025-26 संपले तरीदेखील हा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकसह नांदेड, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयासमोर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. यावेळी डीबीटी आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रशांत गावंडे, कल्पेश खंबाईत, तेजस पाचोरे, दत्ता खरोटे आदी उपस्थित होते.
Protest in the rain outside the Tribal Commissionerate