आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मालेगावात मोर्चा

आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मालेगाव : प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात मालेगावात रविवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. “उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण संरक्षणासाठी एकजूट कायम ठेवा”, “आरक्षण आमचा हक्क आहे” अशा घोषणांनी शहराचा परिसर दणाणून गेला. आरक्षण उपवर्गीकरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर यांनी केले. माजी आमदार बबनराव घोलप यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा एकात्मता चौकापर्यंत काढण्यात आला. मोर्चात महिला, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेत आंदोलकांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने रद्द करावा, अनुसूचित जातींमधील 59 जातींचे आरक्षण एकत्रित ठेवावे आणि आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आरक्षण हा वंचित आणि मागास घटकांच्या हक्काचा प्रश्न असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे विभाजन करू नये, अशी भूमिका मोर्चेकर्‍यांनी मांडली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.

Protest march in Malegaon against reservation sub-categorization.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *