राहुल गांधीही होणार काळाराम चरणी लीन, गोदेची आरतीही करणार

राहुल गांधीही होणार काळाराम चरणी लीन,

गोदेची आरतीही करणार
भारत जोडो न्याय यात्रा मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशकात
नाशिक : अश्‍विनी पांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी , शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या काळाराम दर्शन गोदा आरती नंतर भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौर्‍यावर येणारे राहुल गांधी देखील या काळाराम मंदिरात दर्शन घेत, गोदाआरती करणार असून जिल्हयातील त्र्यंबकेश्‍वरसह विविध धार्मिक स्थळांना भेट देणार असल्याने न्याय यात्रेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कॉग्रेसची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा मार्चच्या पहिल्या आठवड्यात  नाशिक जिल्हयात दाखल होणार असून मालेगावपासून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. पाच दिवस जिल्यातील विविध भागातून  यात्रा जाणार आहे.या यात्रेच्या माध्यमातून कॉग्रेस तळागातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. या यात्रेत शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कामगारांचे प्रश्‍न, आशासेविकांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार , विणकरांचे प्रश्‍न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या दौर्‍यात राहुल गांधी यांच्या सभेचेही नियोजन असणार आहे. या यात्रेचा नाशिक जिल्यातील मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.
कॉग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला  मणिपूरपासून प्रारंभ झाला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या यात्रेचा महाराष्ट्रातील मुंबई येथे समारोप होणार असून  मुंबईच्या आधी नाशिक शहरात भारत जोडो यात्रा येणार आहे.

कॉँग्रेसचे  भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी वॉर रूम
नाशिक शहर कॉग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरू आहे. वॉर रूम गठित केले आहे. या वॉररूमच्या माध्यमातून संघटनेच्या विविध आघाड्या, सेल आहेत. त्यांना मजबूत करण्याचे काम सुरू आहे.

यात्रेत सहभाग नोंदविण्यासाठी मोबाइल नंबर
भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग नोंदविण्यासाठी  कॉग्रेसकडून 8860812345  या मोबाइल नंबरवर  मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राम राजकारणाच्या  केंद्रस्थानी
देशभरात सध्या राममय वातावरण असून श्री प्रभु राम राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. एकीकडे अयोध्येतील राम मंदिराबरोबरच नाशिक शहरातील काळाराम मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना ठाकरे गट पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता कॉग्रेस नेते राहुल गांधी काळारामाच्या चरणी लीन होणार असल्याने श्री प्रभु राम नेमके कोणाला आशीर्वाद देणार हे लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

भारत जोडो यात्रा नाशिक जिल्हयातील मालेगावपासून सुरू होणार असून राहुल गांधी पाच दिवस जिल्हा पिंजून काढणार आहेत. या दौर्‍यात शेतकरी , कामगार,महिला, युवा यांचे प्रश्‍न जाणून घेणार आहेत.त्याचप्रमाणे त्यांच्या सभेचेही नियोजन आहे.या दौर्‍यात ते जिल्हयातील तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत.
या यात्रेच्या निमीत्ताने कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
आकाश छाजेड,(नाशिक काँग्रेस  शहराध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *