शिवसेनेचे आव्हान

शिवसेनेचे आव्हान

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उपकाराची जाणीव भाजपाला राहिलेली नाही, याचा प्रचंड राग उध्दव ठाकरे यांना आहे. हाच राग त्यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केलेला आहे. अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावरुन देशात भाजपाची हवा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत भाजपाला लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याचे एक आव्हान विरोधकांच्या इंडिया आघाडीसमोर आहे. या आघाडीतील एक पक्ष म्हणजे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे. या पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना शिवसेना संपली नसल्याचे दाखवून द्यायचे आहे. पण महाराष्ट्रात भाजपाचा काटाही काढायचा आहे. पण, आता परिस्थिती म्हणावी तितकी सोपी नाही. तरीही भाजपाशी दोन हात करण्याची तयारी त्यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वाची ठरणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमध्ये करताना भाजपा पक्ष बेईमान असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या अधिवेशनात आणि जाहीर सभेतून केला. भाजपाने आतापर्यंत राम मंदिराचे भांडवल केले, करत आहे आणि करणार आहे. हे स्पष्ट असले, तरी राम मंदिराचे भांडवल शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपसोबत राहून केले, हेही तितकेच सत्य. हे सत्य उध्दव ठाकरे यांना नाकारता येत नाही. पण, त्यावेळी भाजपाचे शिलेदार अटलबिहारी वाजपेयी आणि आताचे शिलेदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हाच फरक आहे. उध्दव ठाकरे नेहमीच मागची उदाहरणे देऊन शिवसेनेचे महत्व अधोरेखित करत आहेत. नाशिकमध्ये त्यांनी तेच केले. राम मंदिरासाठी आणि काश्मीरचे ३७० कलम काढण्यासाठी, हिंदूंवरचे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला हवी होती. राजधर्माची आठवण करुन देत तुम्हाला (मोदी) अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकायला निघाले तेव्हा शिवसेनाप्रमुख तुमच्या मदतीला धावले. याची आठवण उध्दव ठाकरे यांनी करुन दिली. तीच शिवसेना आज तुम्ही संपवायला निघाला आहात? हेच तुमचं हिंदुत्व आहे का? असे सवाल त्यांनी केले. कोणत्याही सरकारी संरक्षणाशिवाय मैदानात लढायला यायचे आव्हान त्यांनी भाजपाला दिले. मुख्यमंत्रीपदावरुन भाजपाशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली म्हणून शिवसेनेची आजची ही अवस्था झाली आहे. हे सत्य असले, तरी शिवसेना भाजपाबरोबर राहिली असली, तरी तिला संपविण्याचा भाजपाचा डाव होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपाने हा डाव सुरू केला होता. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर येत असायचे, हे उध्दव ठाकरे यांनी पाहिलेले आहे. पण, तेच अमित शहा आता आपल्याला डिवचून संपवायला निघाले असल्याचा राग उध्दव ठाकरे यांनी बोलून दाखविताना पुन्हा तोच मुख्यमंत्रीपदाचा वाद उकरुन काढला. “मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं त्यांचं म्हणणं असेल, तर २०१४ मध्ये शिवसेनेशी भाजपाने युती का तोडली होती? असा सवाल त्यांनी केला. सन २०१४ मध्ये आपल्याशी युती तुटल्यानंतर ६३ आमदार निवडून आणले. सन २०१४ मध्ये दिल्लीत अशी चर्चा होती की आता बाळासाहेब राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव एकटा काय करणार? आता वेळ आली आहे शिवसेना संपवा, असे एका व्यक्तीने सांगितले होते, असे सांगत त्यांनी भाजपाला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. “मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला आजही सांगतो. २०१९ मध्ये अमित शहा यांनी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं. वचन मोडूनही हे स्वतःला मोडूनही हे रामाचं नाव घेतात. पण आज तुम्हाला सांगतो, जर शहा यांनी मला दिलेलं वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस आज जे ‘पाव मुख्यमंत्री’ आहेत ते अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता? जी काही फोडाफोडी केली ती न करता संपूर्ण शिवसेनेची ताकद तुमच्या बरोबर राहिली असती आणि आत्ता तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) जे वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं आहे ते यावं लागलं नसतं. कारण शिवसेनेने तुम्हाला पुन्हा सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं. पण तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पक्ष पळवता. त्यापेक्षा घातक म्हणजे ३७० कलम काढलं तरीही काश्मीरची परिस्थिती सुधारलेली नाही.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण चुकलो नसल्याचा दावा केला. भाजपाने फसवणूक केल्याचा राग बाहेर काढत त्यांनी भाजपाला मैदानात येण्याचे खुले आव्हान दिले. बीजेपी म्हणजे ‘भेकड जनता पार्टी’, अशी टीका आज उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे कारण मी वारसा घेऊन पुढे चाललो आहे. मात्र भाजपाचे लोक म्हणजे दंगल झाली की, पळणारी अवलाद. आमच्या नेत्यांवर, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या धाडी पडतात. घर आमच्या कार्यकर्त्याचं तिथे हे लोक पाय पसरुन बसतात. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा” असे त्यांनी भाजपाला इशारा दिला. शिवसेना वारसा हक्काने आम्हाला मिळाली आहे, आम्ही चोरून मिळविलेली नाही, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी आपली घराणेशाही मान्य केली. राम मंदिराच्या उभारणीत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्राने देश वाचविला हेच सत्य आहे. शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते. प्रभू श्रीराम कुणा एकट्याचे नाहीत, किंवा एका पक्षाचे नाहीत, असा टोला भाजपाला लगावताना ‘भाजपामुक्त श्रीराम’ करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. राम मंदिर उभारणीचे आणि बाबरी मशीद पाडण्याचे सर्व श्रेय भाजपा घेऊ पाहात असला, तरी त्याकाळी मंदिर आंदोलनात आणि कारसेवेत शिवसेनेचा सहभाग नाकारता येत नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्वाचा भाजपाला मोठा आधार मिळाला होता. बाबरी मशीद पडली गेली तेव्हा कोणीच जबाबदारी घेण्यास पुढे येत नव्हते तेव्हा “होय माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. सन १९९२ साली बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोट झाले आणि दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतली होती, हे सत्य नाकारता येत नाही. तेच उध्दव ठाकरे यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीत रामाचा वापर भाजपा करणार आहे, हे स्पष्ट आहे. त्याच हेतूने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्याचे राजकारण झाले. काहींना उशिरा निमंत्रणे पाठविण्यात आली. निमंत्रणे मिळाल्यानंतर काँग्रससह विरोधी पक्षांनी हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचे सांगत उपस्थित राहणार नसल्याची भूमिका घेतली. उध्दव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. तर शेवटच्या क्षणी त्यांना स्पीड पोस्टाने निमंत्रण पाठविण्यात आले. पण, त्या आधीच त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, याच दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा-अर्चना करण्याचे ठरविले होते. १२ जानेवारी रोजी मोदींनी काळाराम मंदिरात पूजा-अर्चना करुन आपण सच्चे रामभक्त आहोत, हे दाखवून दिले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्री काळारामाच्या दर्शनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वेशभूषा केली होती. ठाकरे यांनी परिधान केलेली भगवी वस्त्रे व गळ्यात घातलेल्या रुद्राक्षाच्या माळा लक्षवेधी ठरल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी शिवसेनेचे अधिवेशन घेतले. सन १९९४ साली नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे भव्य अधिवेशन झाले. या अधिवेशनात मराठमोळ्या पद्धतीने ‘दार उघड बये दार उघड’ हे गोंधळगीत सादर करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती उध्दव ठाकरे यांनी केली. त्यांची सभा यशस्वी झाली तरी भाजपाचे आव्हान मोडून काढण्यासाठी ठाकरेंना इंडिया आघाडीत सलोखा ठेवावा ठेवून जागा वाटप करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *