महाराष्ट्र

राजे नव्या मोहिमेवर

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सातारचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले आता नव्या मोहिमेवर निघाले आहेत. त्यांची एकूणच कर्तबगारी पाहून भारतीय जनता पार्टीने त्यांना सहा वर्षांपूवी राज्यसभेत बसण्यासाठी गादी दिली. केंद्र सरकार किंवा भाजपाने ठरविले, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. गेल्या सहा वर्षांत खासदारकी, भाजपाशी आणि केंद्र सरकारशी जवळीक असूनही राजेंना मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. कायद्याच्या कसोटीवर मराठा समाजाला आरक्षण मिळणे अवघड असल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य सरकारकडे वळविला. आरक्षण वगळता मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राजेंनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे मागण्यांची जंत्री सादर केली. त्यातील काही मागण्या मान्यही झाल्या. राज्यसभेवर असूनही त्यानी केंद्रातील सरकारकडे त्यांनी फार मागण्या केल्या नाहीत. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही त्यांना मिळणे अवघड झाले होते. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेतृत्व आपणच करत आहोत, हेच संभाजीराजे दाखवून देत असले, तरी उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांचे फारसे पटत नाही. राज्यातील राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांशीही त्यांचे सूत जमत नाही. राज्यसभेवर नियुक्त करुनही भाजपालाही लाभ झाला नाही. राज्यसभेतील मुदत संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्याही पक्षात नाही, असे जाहीर करुन त्यांनी भाजपाशीही संबंध तोडले आहेत. आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतरही त्यांनी राज्य सरकारला इशाऱ्यावर इशारे देत आपले नेतृत्व सिध्द करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आपणच न्याय देऊ शकतो, हेच दाखवून देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. तेच अधोरेखित करण्यासाठी त्यांनी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘स्वराज्य’ हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराज संपूर्ण देशाला परिचित असून, तेच स्वराज्य संभाजीराजेंना अपेक्षित असेल. याच कारणास्तव त्यांनी संघटनेला ‘स्वराज्य’ हे नाव दिले असावे. याच संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याची एक मोहीम राजेंनी हाती घेतली आहे.
राजकीय पक्षाचा पाया
‘स्वराज्य’ ही मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखली जाईल. मराठा समाज नव्हे, तर मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवला, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अठरापगड जातींचे नेतृत्व करण्याची संधी राजेंना मिळू शकते. शिवसेनेना मराठी माणसाकडून हिंदुत्वाकडे वळली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्याच मार्गाने गेली. अशा परिस्थितीत मराठी माणसाची अस्मिता हिंदुत्वात विलीन झाली आहे. मराठी अस्मिता जागृत करण्याची एक संधी राजेंना मिळू शकते. ‘स्वराज्य’ ही संघटना राजकीय होणार काय? हा प्रश्न असून, राजेंनी त्याचेही उत्तर देऊन टाकले. सध्या राजकारणात अपक्ष म्हणून निवडणुका लढविण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे अनेकांनी त्यांना सुचविले आहे. सूचना करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करत त्यांचे आभारही मानले. आपल्या राजकीय वाटचालीचा हा पहिलाच टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. आपणास राजकारण समजत नसल्याचा टोलाही त्यांनी सर्व संबंधिताना लगावून ‘स्वराज्य’ संघटित करण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही जाहीर केले आहे. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे या संघटनेचा उद्या राजकीय पक्ष झाला, तरी त्यात कुणीही वावगे समजू नये, असे त्यांनी स्पष्ट करत नवीन राजकीय पक्षाचा पाया रचला आहे. महाराष्ट्र आणि देशातील अनेक सामाजिक संघटनांचे राजकीय पक्षांमध्ये रुपांतर झालेले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असताना मराठा समाजासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याला व्यापक स्वरुप मिळू शकले नाही. ‘स्वराज्य’चे रुपांतर राजकीय पक्षात होण्याची शक्यता राजेंच्या वक्तव्यातून बळावली आहे. कुणी पक्ष काढणे काही चुकीचे नाही. दुसऱ्यांनी पक्ष काढायचा आणि आम्ही काढायचा नाही, असे काही आहे काय?” असा सवाल त्यांनी करत पक्ष स्थापनेचे संकेत दिले आहेत. मराठा समाज वेगळ्या राजकीय पक्षांत विभागलेला आहे. तो नव्या ‘स्वराज्य’ संघटनेला किंवा पक्षाला कसा प्रतिसाद देणार, हे आगामी काळात समजेलच. राजेंना मानणारा एक वर्ग नक्कीच आहे. त्याच बळावर ‘स्वराज्य’चे पुढील वाटचाल असणार आहे. राजकीय पक्ष म्हणून ही संघटना पुढे आली, तर तिला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल. या पक्षाचा कितपत प्रभाव जाणवेल, हा एक प्रश्न असला, तरी एका पक्षाची राज्याच्या राजकारणात पडणार आहे.
अपक्ष आमदारांना आवाहन
राजेंचे राज्यसभा सदस्यत्व खाली होत असून, राज्यसभेवर परत जाण्याची त्यांची इच्छा आहे. राज्यसभेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या असून, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला आहे. राज्यसभा निवडणुकीत विधानसभेतील गणिते अवघड असतात. फोडाफोडीसाठी डावपेच लढविले जातात आणि गनिमी कावेही पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका नको म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपल्या संख्याबळानुसार निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात. विद्यमान परिस्थिती पाहता राजेंची निवड होणे अवघड आहे. विधानसभेतील २९ अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान १० अपक्ष आमदारांचे अनुमोदन मिळाले, तर संभाजीराजे राज्यसभा निवडणुकीत चुरस निर्माण करू शकतील. अर्थात, अपक्ष आमदारांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, यावर बरेच अवलंबून आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपला असल्याने, त्यांना काहीतरी भूमिका स्पष्ट करावी लागणार होती. ती त्यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. आपली ताकदच नव्हे, तर अस्तित्व दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला नाही, तर त्यांच्यावर ‘मराठाविरोधी’ शिक्का पडण्याचा संभव आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी अपक्ष आमदारांना अडचणीत आणले आहे. ‘स्वराज्य’ची भूमिका राज्यभर मांडण्याची मोहीम सोपी आहे. मात्र, अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवून जिंकण्याची मोहीम अवघड आहे. हे त्यांना समजत असले, तरी कोठेतरी सुरुवात करण्याचा भाग म्हणून छत्रपती संभाजीराजे भोसले एका नव्या मोहिमेवर निघाले आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago