अनेक वर्षांपासून नगरपरिषदेला आरोग्य निरीक्षक नाहीत; घाणीचे साम्राज्य
इगतपुरी : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी नगरपरिषदेत आरोग्य निरीक्षकपद रिक्त असल्याने शहरातील घनकचरा व आरोग्य सुविधा धोक्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ मांडला जात आहे. त्यामुळे शहराची आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.
शहरातील वस्ती व प्रभागांमध्ये मोठमोठे नाले, घनकचर्याच्या घाणीने गच्च भरून गेले आहेत, तर शहरांतर्गत गटारीही घाणीने तुडुंब झाल्या आहेत. यामुळे शहरात आजारांचे थैमान झाले असून, अनेक नागरिक खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर अनेकांना चर्मरोग, शरीरावर चट्टे आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेला कोणी आरोग्य निरीक्षक देतील का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित
केला आहे.
नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी काम न करता भटक्या मुसाफिर व भिकार्यांना काही मोजके पैसे देऊन ठरविलेल्या बाजारपेठेचा भाग स्वच्छ करून घेत कर्तव्य बजावताना दिसत आहेत. अनेक सफाई कर्मचारी नगरपरिषदेत आस्थापना विभाग, कर विभाग, पाणीपट्टी, घरपट्टी वसुली पथक, अनेक सफाई कर्मचारी मुकादमपदी स्वयंघोषित आहेत. मग सफाई कर्मचारी कोण आणि अधिकारी कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराच्या विकासाला आणि घनकचरा व्यवस्थापनाला शासनाचा निधी येतो. मात्र, नगरपरिषदेमार्फत स्वच्छता अभियान राबविले जात नाही. त्यामुळे महिला बचत गटाचे कार्यक्रम राबवून याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी नगरपरिषदेत सक्षम मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी आहे. शहरातील हॉटेल व खाद्यपदार्थांची घाण व सांडपाणी गटारात साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोणत्याही हॉटेल्स व टपर्यांवरील पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ तपासण्यासाठी आरोग्य निरीक्षक नाही, तर शहरात घनकचरा व्यवस्थापन आणि कीटकनाशक फवारणी केली जात नाही. मात्र, शहर स्वच्छताच्या नावाखाली नगरपरिषद आरोग्य विभागातून ठेकेदारांचे मोठमोठी बिले अदा केली जातात. ही जनतेची आणि शासनाची फसवणूक असल्याची नागरिकांमध्ये ओरड आहे.
सहा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत टेंडरद्वारा चढ्या भावाने वस्तू घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी काही वस्तू उपलब्ध नाहीत. खरेदी केलेल्या वस्तू अशा- खराटा 1 नग – 320 रुपये विळा 1 नग 230 रुपये खुरपे – 1 नग 120 रुपये. प्लास्टिक पाणीटाकी 1000 लिटर 1 नग 12,500 हॅण्डग्लोज 1 नग 330 रुपये. गम बूट 1 जोड 1180 रुपये. सेफ्टी जॅकेट 1 नग 630 रुपये. ताडपत्री 20- 20 आकाराची 1 नग 650 रुपये. अशा अनेक वस्तू खरेदी चढ्या भावाने घेतल्या जातात. यातून शासनाची दिशाभूल केली जात आहे.
मलमूत्र थेट नाले, गटारात
शहरात बाजारपेठेतील अनेक हॉटेल्स व व्यापारी इमारत आणि शहरांंतर्गत असलेल्या बहुतांश नागरिकांच्या शौचालयाच्या टाक्या नसून, मलमूत्र थेट नाल्यात किंवा गटारातून वाहत असते. याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. याकडे लक्ष देण्यासाठी नगरपरिषदेत आरोग्य निरीक्षक नसल्याने सर्व कामकाज काही रामभरोसे कर्मचारी कारभार करत आहेत.
कचरा विलगीकरणाचा घाट कशासाठी?
शहरात घंटागाडी काही प्रभागांत जाते, तर काही प्रभागांत घंटागाडी जाण्यासाठी अतिक्रमण झाल्याने रस्ताच नाही. त्यामुळे अनेक नागरिक नाल्यात व रस्त्याच्या कडेला घाण टाकतात. घंटागाडीत ओला कचरा-सुका कचरा असे वर्गीकरण केले आहे. सफाई कर्मचारी नागरिकांना सांगतात, मात्र घनकचरा व्यवस्थापन हे डंपिंग ग्राउंडवर सर्व कचरा एकत्र करून ढिगारा करतात, मग कचरा विलगीकरणाचा घाट कशासाठी?