त्र्यंबकेश्वरला 194 तर शहरात 132 मिमी विक्रमी पावसाची नोंद
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील महापूर आला आहे. त्र्यंबकला 194, तर नाशिक शहरात 132 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण 97 टक्के भरल्याने धरणातून 13 हजार 932 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील विसर्गासोबतच शहर परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी गोदावरीत मिसळल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला. गोदाघाटावरील अनेक मंदिरे, घाट, रामसेतू परिसर आणि नदीकाठचा मोठा भाग जलमय झाला आहे.
शहरातील सखल भागात पाणी साचले असून, दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मुसळधार पावसाचा व्यावसायिक व पथविक्रेत्यांना मोठा फटका बसला असून, त्यांना आपला व्यवसाय पावसामुळे पूर्ण बंद ठेवावा लागला. पावसाचा हवेचा वेग असल्याने शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. इंदिरानगरकडून सिटी सेंटरकडे जाणार्या रस्त्यावर दुचाकीवर झाड उन्मळून पडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही तसेच प्रसाद सर्कल येथेदेखील झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, पूरपरिस्थिती व पावसाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते.
धरणे ओव्हरफ्लो
गंगापूर धरण – 97% गौतमी-गोदावरी – 90%
कश्यपी – 71% पुणेगाव-97.91%
दारणा -85% भावली-100%
वालदेवी- 96.97% कडवा-80.98%
नांदूरमध्यमेश्वर-100% भाम-87%
असा आहे विसर्ग
गंगापूर-13932 कडवा-10995
भावली-3247 पालखेड-6610
पुणेगाव-8201 होळकर ब्रिज-16169
दारणा-15498 गौतमी गोदावरी-3000
नांदूरमध्यमेश्वर-55778 वालदेवी-2175
मुसळधार पावसाने शाळांना अघोषित सुट्टी
शहरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गुरुवारीदेखील दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले तसेच सखल भागातही पाणी शिरले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील बहुतांश शाळांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेत शाळांना अचानक सुट्टी जाहीर केली. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांना व्हॉट्सअॅप आणि मोबाइलद्वारे माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी घरीच राहिले. मात्र, असे असले तरी काही शाळा नियमित सुरू होत्या, त्यामुळे सुट्टीबाबत पालकांमध्ये संभ्रम दिसून आला.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नागरिकांनी नदीकाठावर गर्दी करू नये, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सतर्कता बाळगावी.
– डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्तहवामान विभागाने पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार धरणातील विसर्गात बदल केला जाणार आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा न मानता पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे. नदीकाठ, पूल आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. सर्व यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
बाजारपेठा बंद
गोदवरी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या सखल भागात राहणार्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सराफ बाजार, भांडी बाजार, रामकुंड, रामसेतू आणि नदीलगतच्या वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गाडगे महाराज पूलही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अधिकार्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी होळकर पुलावरून रामकुंड व गोदावरी नदी परिसरातील पुराची पाहणी करत आढावा घेतला.
शहरात चोवीस तासांत विक्रमी 132 मिमी पाऊस
नाशिक जिल्ह्यात 45 मिमी पाऊस झाला आहे. तर नाशिक शहरात चोवीस तासांत 132 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या 24 तासांत 194 मिमी पावसाची नोंद झाली असून, सिन्नरमध्ये 164.5 मिमी, इगतपुरीत 56 मिमी तर नांदगावमध्ये 4.4 मिमी पाऊस झाला आहे.
गोदावरी नदीपात्राची अशी आहे धोकादायक पातळी
गोदवरी नदीतून 62 हजार क्यूसेक पाणी विसर्गाचा उच्चांक आहे. 2008 मध्ये 42 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गंगापूर धरणातून 13932 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत असून, होळकर पुलाजवळ 19 हजार 79 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, सायंकाळी विसर्ग कमी करत 16169 इतका विसर्ग होळकर पुलाजवळून करण्यात आला.
Rampaging rains, massive floods in the Godavari.