संपादकीय

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

 

भारतमाता पारतंत्र्याच्या जोखडात अडकलेली असताना आजच्याच दिवशी १९०९ साली सशस्त्र क्रांतीचं केंद्र अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात एक विलक्षण घटना घडली.
नाशिकचा जिल्हाधिकारी म्हणून जॅक्सनची नियुक्ती करण्यात आली होती. ‘मधु तिष्ठति जिव्हाग्रे, हृदये तु हलाहलम्’ म्हणजे जीभेच्या टोकावर मध परंतु हृदयात जहाल विष अशी जॅक्सनची वृत्ती होती. नाशिकचे नागरिक विशेषतः युवक हे देशप्रेमाने भारलेले व स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी योजना आखत आहेत याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण तो फार चतुर होता. एकीकडे इंग्रज-विरोधक तरुणांमध्ये भीती निर्माण करायची आणि दुसरीकडे सर्वसाधारण जनतेला मात्र इंग्रजांबद्दल आपुलकी वाटेल असं वागून अनुकूल वातावरण निर्माण करायचं असं त्याने ठरवलं होतं. इंग्रज अधिकारी भारतीयांमध्ये फारसे मिसळत नसत. पण जॅक्सन मात्र घोड्यावर बसून नाशकातून फेरफटका मारत असे. लोकांची विचारपूस करत असे. त्यांच्याशी चक्क मराठीत बोलत असे. मनानेही गुलाम झालेल्या माणसांना यांतच धन्यता वाटे. स्वातंत्र्यप्रेमी देशभक्त लोकांचा इंग्रजांवरचा राग घालवून , देशभक्तांविषयी जनतेत अप्रीती निर्माण करण्यासाठीच्या त्याच्या या धूर्त तंत्राला भोळे भाबडे लोक फसायचे. परंतु त्याच्या हुकूमशाही,जुलूम, अत्याचारांची कल्पना असलेले जाणकार लोक या गोष्टींची परस्परांना आणि इतरेजनांनाही माहिती द्यायचे. ते लोकांना सांगायचे, हा जॅक्सन वरवर चांगला वाटत असला तरी शेवटी तो जुलमी आणि ब्रिटिशांचा प्रतिनिधी आहे. भारताला कायमचं गुलामगिरीत जखडून ठेवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या इंग्रजांचा तो प्रतिनिधी आहे!
जॅक्सनचे अत्याचार,दडपशाही सुरूच होती. व्याख्यानांद्वारे स्वातंत्र्याविषयी जागृती करणाऱ्या, देशभक्तांवरचे खटले मोबदला न घेता चतुराईने चालवणाऱ्या खरे वकीलांची सनदच त्याने काढून घेतली आणि त्यांना धारवाडला पाठवलं. तांबे शास्त्री आपल्या कीर्तना-प्रवचनांतून स्वातंत्र्ययज्ञ अधिक प्रज्वलित करण्याचा संदेश अप्रत्यक्षपणे देतात म्हणून त्यांची कीर्तन-प्रवचनेही जॅक्सनने बंद पाडली. तसेच ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देणाऱ्या तरुणांनाही त्याने कठोर शिक्षा दिली. एका बैलगाडीमुळे विल्यम्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या घोडागाडीला पुढे जायला थोडा उशीर होत होता म्हणून संतप्त होऊन त्या बैलगाडीच्या बिचाऱ्या गाडीवानाला ‘काला आदमी’ असे संबोधत, शिव्यांची लाखोली वाहत विल्यम्सने इतक्या अमानूषपणे मारहाण केली की त्यातच त्या गाडीवानाचा मृत्यू झाला. पण एवढं सगळं होऊनही जॅक्सनने विल्यम्सची पाठराखण केली. गाडीवानाचा मृत्यू पोटाच्या आजाराने झाला असा निर्वाळा देऊन विल्यम्सची सुटका केली. जॅक्सनच्या या क्रूर कृत्यांमुळे नाशिककर देशभक्त तरुणांची माथी अधिकाधिक भडकत होती. तर तिकडे औरंगाबादला अनंत कान्हेरे नावाच्या अतिशय तेजस्वी आणि धाडसी युवकाचे मनही प्रक्षुब्ध झाले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशकात अभिनव भारत या संस्थेमार्फत क्रांतिकारकांची चळवळ उभारली होती. त्यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर हे या संस्थेचे एक आधारस्तंभ आणि तरुणांचे मार्गदर्शक होते. या संस्थेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी मेळे भरवायचे. व्याख्याने,कीर्तने-प्रवचने, गायन यांतून देशभक्तीचा प्रचार करायचे. जुलमी राजसत्तेला उलथवून टाकून भारताला स्वतंत्र करण्याची प्रेरणा ते लोकांना देत असत. त्यातीलच एक देशभक्त होते- गोविंद उर्फ आबा दरेकर. शरीराने अधू असलेल्या आबांनी सावरकरांच्या प्रेरणेने देशभक्तीपर कवनं रचायला सुरुवात केली होती. पण ती केवळ मौखिक पध्दतीने मर्यादित लोकांपर्यंत पोहोचायची. म्हणून बाबाराव सावरकरांनी कवी गोविंदरचित काही कवितांची पुस्तिका काढून वाटप केले. पण हे देशकार्य जॅक्सनला कसे सहन होईल? त्याचे पित्त खवळले. त्याने या पुस्तकांवर बंदी घातली, बाबारावांना अटक केली आणि त्यांच्यावर देशद्रोही वाड्.मय प्रकाशित केल्याबद्दल राजद्रोहाचा खटला भरला. पोलिस कोठडीतून बाबारावांना जेव्हा खटल्याच्या कामासाठी कोर्टात नेत असत तेव्हा त्यांना एखाद्या चोर- दरोडेखोराप्रमाणे हातात बेड्या अडकवून धिंड काढत पायीच नेले जाई. हे पाहून दु:खी होणाऱ्या नाशिकच्या जनतेच्या मनात अधिकाऱ्यांविषयी चीड निर्माण होई. देशभक्तीपर कवितांची छोटी पुस्तिका छापल्याचा ठपका ठेवून ब्रिटिशांनी बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठवलं. यामुळे जनप्रक्षोभ आणखीनच वाढला.
या सर्व वार्ता कानी पडत असताना कोवळ्या अनंताचे मनही पेटून उठत होते. या मन:स्थितीत असतानाच त्याच्या हाती स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित मॅझिनीचे लागले. ते वाचून त्याचे मन अधिकच सिध्द झाले. गणू वैद्य नामक मित्राला अनंत म्हणाला,” तुम्ही लोक एक मोठी चूक करता. ज्या एखाद्या जज्जाने स्वदेशभक्तांस शिक्षा दिल्या, त्याचा खून केल्याशिवाय राहू नये. म्हणजे त्यास दरारा बसेल.”
अशातच मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध करुन लंडनमध्ये घेतलेल्या प्रतिशोधाने तर अनंतासमोर एक आदर्शच उभा राहिला. धिंग्रांसारखे हौतात्म्य आपणही पत्करावे असे तो वारंवार म्हणू लागला. एकदा आपला जीवलग मित्र गंगाराम मारवाड्यास तो म्हणाला,” धिंग्रांसारखा देशभक्त पुन्हा कधी होईल काय रे.” दुसऱ्या दिवशी गंगारामने अनंत कान्हेरेंची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. सांडस नावाचा ज्वलनशील पदार्थ अनंताच्या हाताला लावली तरी त्याने मूखातून शब्द काढला नाही. पुढच्या दिवशी जळत्या चिमणीची तापलेली काच अनंताला धरायला लावली. हाताची कातडी सरसर जळाली. पण अनंताने तो दिवा सोडला नाही. शेवटी चिमणी ताडकन फुटली. पण वेदनांमुळे होणाऱ्या दु:खाने अनंताना सुस्काराही सोडला नाही. त्याची निर्विकार मुद्रा आणि सहनशीलता पाहून गंगाराम म्हणाला-
” आहेस तू खरा निधड्या छातीचा! प्रसंग पडला तर धिंग्रांप्रमाणेच काहीही करण्यास तू मागेपुढे पाहणार नाहीस!”
एके दिवशी अनंत कान्हेरेंनी गणू वैद्याजवळ जॅक्सनच्या वधासाठीची आपली सिद्धता बोलून दाखवली. ती त्याने नाशिकच्या काही देशभक्त मित्रांना सांगितली. त्यात कृष्णाजी गोपाळ उर्फ अण्णा कर्वे नावाचे वकील, विनायक नारायण देशपांडे हे नाशिकच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक तर शंकर सोमण, दाजी जोशी ही काही गणू वैद्याची मित्रमंडळी होती.
देशपांडे व कर्वेंच्याही मनात जॅक्सन वधाची इच्छा होती. पण त्यांनी जानेवारीत १९१० मध्ये वध करण्याचे ठरवले होते. देशपांडेंनी अनंताशी ओळख करुन आपल्याजवळचं एक पिस्तुल त्याला दिलं. अनंताने कलेक्टर कचेरीत जाऊन जॅक्सनचं बारकाईने निरीक्षण केलं आणि दूरवरच्या निर्मनुष्य भागात जाऊन पिस्तुल चालवण्याचा सराव केला. काही कारणाने प्रत्यक्ष कृत्याला विलंब होऊ लागला तसा अनंत पुन्हा औरंगाबादला परतला. पण बढती होऊन जॅक्सनची बदली होण्याची वार्ता आली. त्यामुळे त्याच्या वधाचे पुण्यकृत्य आताच उरकलं पाहिजे याची जाणीव देशपांडे-कर्वे प्रभृतींना झाली. अनंताची भेट घेऊन उद्याच हे काम करायचे आहे असे सांगून देशपांडेंनी अनंताला नाशिकला बोलावून घेतले. अनंत कान्हेरे रेल्वेने नाशिकला आले.
नाशिकमध्ये बदलीनिमित्त जॅक्सनचे निरोप समारंभ, सत्कार सर्वत्र होत होते. असाच एक समारंभ मंगळवार दिनांक २१ डिसेंबर १९०९ रोजी व्हायचा होता. त्यात किर्लोस्कर नाटक मंडळीचा २२ डिसेंबरला होणारा संगीत शारदाचा नाट्यप्रयोगही आदल्याच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरलाच करायचा ठरलं. त्याचं आमंत्रण जॅक्सनने स्वीकारलं. अण्णा कर्वेंनी जॅक्सनवधासाठी हाच मुहूर्त पक्का केला‌. त्यासाठी सिध्द असलेल्या अनंताची योजना केली. शिवाय अनंताला अपयश आले तर स्वतः ते कृत्य करण्याची तयारी ठेवली. त्यांचाही प्रयत्न हुकला तर विनायकराव देशपांडेंनी ही कामगिरी पार पाडायची असं ठरलं! पण अनंत कान्हेरेंचा पूर्ण निश्चय झाला होता. ते स्वतःच हे पुण्यकर्म करणार होते!
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील विजयानंद नाट्यगृहात रात्री ९ वाजता संगीत शारदाचा प्रयोग होता. अनंत कान्हेरे तिथे पोहोचल्यावर विनायकरावांनी जॅक्सन जिथे बसणार होता त्याच्या मागच्या बाजूच्या खुर्चीचं जिथे अण्णा कर्वे बसलेले होते त्यांच्या बाजूचं एक आणि कमी किंमतीचं, रंगमंचाच्या बाजूच्या ओट्यावर बसून नाटक बघण्याचं एक अशी दोन तिकिटे दिली. जॅक्सनला समोरुनच गोळ्या घालून ठार करावं असं कान्हेरेंच्या वीरवृत्तीला वाटलं असावं. म्हणून त्यांनी ओट्यावर बसणं पसंत केलं.
नाटक वेळेवर सुरु झालं. जॅक्सन १५-२० मिनिटांनी आला. तो पहिल्या रांगेतील आपल्या खुर्चीकडे चालत जात असतानाच अनंत कान्हेरे ओट्यावरुन खाली उतरले आणि धोतरामध्ये व्यवस्थित ठेवलेलं पिस्तुल काढून चपळाईने जॅक्सनवर मागून गोळी झाडली. पण ती जॅक्सनच्या हाताखालून निघून गेली. तेव्हा कान्हेरे झटकन पुढे सरकून जॅक्सनच्या समोर आला आणि चक्क त्याच्यासमोर उभं राहून कान्हेरेंनी त्याच्यावर एकापाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. या आघातांनी तो रक्तबंबाळ झाला आणि मृतावस्थेतच खाली कोसळला. यावेळी कान्हेरे फक्त अठरा वर्षांचे होते!
या प्रकाराने सगळीकडे एकच गोंधळ उडाला. एकाने अनंत कान्हेरेंचा हात धरला आणि एकाने त्यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला.
पण त्यांनी प्रतिकार करण्याचा, स्वतः वर गोळी झाडण्याचा अथवा मित्राने दिलेली विषाची पुडी तोंडात टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. कान्हेरेंना पकडण्यात आलेलं होतं‌. पण ते शांत होते.’ मी पळून जाणार नाही, मी माझं कर्तव्य केलेलं आहे.’ असं त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला निर्भयपणे सांगितलं. मस्तकी झालेल्या प्रहाराने जखम झाली होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं‌. पण तरीही ते निश्चल होते.
नंतर सगळीकडे शोध घेतला जाऊन देशभक्त तरुणांची धरपकड सुरू झाली. गणू वैद्याकडे सापडलेल्या पिस्तुलांचा शोध घेऊन जॅक्सन वधाचा संबंध थेट लंडनमध्ये असलेल्या सावरकरांशी जोडला. कारण अनंताने ज्या पिस्तुलाने वध केला होता ते पिस्तुल सावरकरांनी भारतात पाठवलेल्या पिस्तुलांपैकी एक होतं! पुढे सावरकरांना अटक होऊन भारतात आणून जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवण्यात आलं.
अनंत कान्हेरेंवरचा खटला मुंबईत चालवण्यात येऊन त्यात सात व्यक्तींवर खूनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
या खटल्याचा निकाल २९ मार्च १९१० रोजी लागून कान्हेरे, कर्वे देशपांडे यांना फाशीची शिक्षा तर शंकर सोमण, दाजी जोशी यांना जन्मठेप जाहीर झाली. उर्वरित दोघे माफीचे साक्षीदार झाले.
अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात नेऊन १९ एप्रिल १९१० ला फाशी देण्यात आली! यावेळी अनंत कान्हेरे अवघे १९ वर्षांचे, कर्वे २३-२४ वर्षांचे तर देशपांडे २१ वर्षांचे होते!
या देशभक्तांनी कोवळ्या वयातच स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
मॅडम कामा युरोपच्या आपल्या ‘वंदे मातरम् ‘ पत्रात या घटनेचा गौरवपूर्ण उल्लेख करताना लिहितात जॅक्सनचा वध म्हणजे –
” सर्व देशभक्तांच्या आनंदोत्सवात नाशिक येथे साजरा करण्यात आलेला राष्ट्रवाद्यांचा आणखी एक पराक्रम!”

आपणही या अतिशय प्रेरणादायी परंतु काहीशा दुर्लक्षित पराक्रमाचा आठव करुया आणि या वीर हुतात्म्यांना वंदन करुया!

– मधुरा विवेक घोलप.

संदर्भ:-
१) ज्वालामुखीचे अग्निनृत्य- वि.श्री. जोशी
२) पराक्रमी युवक अनंत कान्हेरे- डॉ. म. बा. कुलकर्णी

Ashvini Pande

Recent Posts

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

7 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

10 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

10 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

10 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

10 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

10 hours ago