भेटीगाठींच्या सत्राने वाढवली राजकीय धाकधूक!
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड खलबते केली होती. त्यानंतर राज्यात भेटीगाठींचे सत्र अचानक वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेची शाई वाळत नाही तोच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गाठून देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली. या एकापाठोपाठ एक होत असलेल्या अनपेक्षित भेटींमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या भूकंपाची आणि भविष्यातील नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
दुसरीकडे, कट्टर विरोधक मानल्या जाणार्या ठाकरे गटाच्या (उबाठा) प्रमुख नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसाठी असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत असले, तरी या भेटीच्या टायमिंगमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच राजकीय धाकधुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार सध्या अत्यंत अस्वस्थ असून, उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखीच अवस्था आता पवारांच्या पक्षाचीही होऊ शकते, असे स्फोटक विधान चव्हाण यांनी केले आहे.
या सर्व घडामोडींवरून सुरू असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत तिखट शब्दांत उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या भेटीवर टीका करणार्या संजय राऊतांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, पवारसाहेब मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आल्यावर त्यांचे स्वागत करणे ही राज्याची राजकीय संस्कृती आहे. यावरून ज्यांच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, त्यांनी आम्ही सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’मध्ये जाऊन मोफत उपचार घ्यावेत. एका बाजूला विरोधकांवरअसा शाब्दिक हल्ला चढवत असतानाच, एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकाच गाडीतून प्रवास करत तब्बल 30 मिनिटे गुफ्तगू केल्याने पडद्यामागे काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचे आणखी एक ठळक उदाहरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचक विधानातून पाहायला मिळाले. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, उद्या उद्धव ठाकरे आले तरी आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करू, असे सांगतानाच सरनाईक यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना थेट ऑफर दिल्याचे उघड केले. शिंदे यांच्या दालनात सुनील तटकरे आणि जयंत पाटील एकत्र असताना, तुमची शिवसेनेशी जवळीक जास्त आहे, तुमच्यासाठी आम्ही आमच्याकडे जागा करू शकतो, असे आपण जयंत पाटलांना म्हणाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तत्पूर्वी, काल ओबीसी नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. या सर्व नाट्यमय घडामोडी, गुप्त बैठका आणि नेत्यांच्या सूचक विधानांमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कोणते नवे चित्र दिसणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Rapid developments in state politics