नाशिक : प्रतिनिधी
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना देण्यात येणार्या सुविधा कोरोनाच्या नावाखाली बंद केल्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना संपून दैनंदिन जीवन सुरळीत होऊनही रेल्वेने सुविधा सुरू करण्यास हात आखडता घेतला असल्याचे चित्र आहे.
रेल्वेमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांसह इतर सवलती प्रवासात दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सवलत असते. तर दिव्यांगांना वन फोर आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पन्नास टक्के सवलत रेल्वेकडून देण्यात येते. कोरोना काळात प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेगाड्यांची संख्या कमी करण्यात आली होती. फक्त विशेष रेल्वेच सुरू ठेवल्या होत्या. त्यातही रेल्वे प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट विक्रीच सुरू होती. जनरल तिकीट काढावयाचे झाले तरी ऑनलाइनशिवाय पर्याय नव्हता. आता रेल्वेने तिकीट विक्री सुरू केली असली तरी कोरोनाच्या नावाखाली बंद केलेल्या सुविधा मात्र अद्यापही बंदच ठेवल्या आहेत. मध्यंतरी लोकसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी उत्तर देताना या सुविधा बंद केल्याचे सांगितले होते. मात्र, त्या पूर्ववत कधी करणार, याबाबत काहीच भाष्य केले नाही.
एसटी महामंडळाच्या सुविधा जर सुरळीत सुरू आहेत तर रेल्वेने कोरोनाच्या नावाखाली या सुविधा बंद ठेवण्याचे कारण काय? असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. या सवलती बंद असल्यामुळे प्रवाशांना पात्र असूनही विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या फक्त दिव्यांगांच्या सुविधा सुरू ठेवलेल्या असून, इतर सुविधांचे रेल्वेला वावडे आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
‘खासदारांनी प्रयत्न करावेत’
रेल्वेच्या सुविधा पूर्ववत होण्यासाठी नाशिकचे खा. हेमंत गोडसे आणि केंद्रात मंत्री असलेल्या भारती पवार यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.