पावसाची हजेरी; कॉम्प्लेक्ससह दुकानांत शिरले पाणी
चांदवड : वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चांदवड शहरासह तालुक्यात सोमवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाजी चौक परिसरासह शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांनी अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले होते. कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचे पाणी थेट काही दुकानांमध्ये शिरल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले.
सोमवारी चांदवडचा साप्ताहिक बाजार असल्याने शहरात नागरिक, शेतकरी आणि व्यापार्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारकरूंची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील सोमवार पेठ परिसरात गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
रस्त्यावरून पाण्याचे जोरदार प्रवाह वाहत असल्याने वाहनचालक आणि पादचार्यांना रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्ससह काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. दरवर्षी पहिल्याच पावसात हीच समस्या उद्भवते. पालिकेने पाणी निचर्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्यांनी केली.
बळीराजा सुखावला; मशागतीला वेग
तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग मिळणार आहे. वरुणराजाचे स्वागत करत शेतकर्यांनी आगामी काळातही अशाच चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Roads in Chandwad city turned into rivers.