‘सभा यशस्वी’ हाच दादा भुसेंना इशारा!
देशात सर्वत्र निवडणूकपूर्व वातावरण कमालीचे तापले असून, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या विरोधात असलेले अनेक पक्ष आक्रमक भूमिका घेऊ लागले आहेत. शिवसेनेत बंड घडवून आणण्यात भाजपाचाच हात असल्याने शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार उध्दव ठाकरेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा मुकाबला करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजपाचे राज्यातील नेते विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेच त्यांचे खरे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. या सर्वांचे आव्हान उध्दव ठाकरे पेलत असून, राज्यात ठिकठिकाणी सभा घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांनी पहिली सभा कोकणात असलेल्या रत्नागिरीतील खेडमध्ये घेतली. दुसर्या सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातील मालेगावची त्यांनी निवड केली. मुस्लिमबहुल मालेगाव शहर संवेदनशील असून, या शहराचा बाह्य भाग हिंदूबहुल आहे. हिंदूबहुल भागातील म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील आमदार दादा भुसे यांना शह देण्यासाठी आणि शिवसेना ठाकरे गटात नुकताच प्रवेश करणारे अद्वय हिरे यांची दादा भुसेंच्या विरोधात उमेदवारी पक्की करण्यासाठीच शिवगर्जना सभा घेण्यात आली.
सहानुभूतीची गर्दी
निवडणूकपूर्व वातावरण लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होतच असते. गर्दी झाली म्हणजे सभा यशस्वी झाली, असे आजच्या परिस्थितीत म्हणता येत नाही. खेडमध्ये उध्दव ठाकरेंनी प्रचंड सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवढी प्रचंड ‘उत्तरसभा’ घेतली. मालेगावातही ‘उत्तरसभा’ घेण्याचे दादा भुसे किंवा शिंदे गटाने ठरविले, तर तितकीच गर्दी जमविणे काही अवघड नाही. त्यामुळे सभेत गर्दीचा प्रश्न आजकाल महत्वाचा मानला जात नाही. मात्र, अनेक अडथळ्यांवर मात करत ठाकरेंची शिवसेना गर्दी जमविण्यात यशस्वी ठरली. यामध्ये अद्वय हिरे यांचा मोठा वाटा असला, तरी शिवसेनेतील बंडानंतर उध्दव ठाकरे यांच्याविषयी एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आहे. भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि मनसे हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करत आहेत. याचमुळे अल्पसंख्याक समाजात उध्दव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. मालेगावच्या सभेसाठी उर्दू भाषेतही पोस्टर्स आणि फलक झळकण्यामागे सहानुभूतीच आहे. आंबेडकरवादी समाजाचा ठाकरे घराण्याला असलेला विरोध मावळत चालला असून, त्यात वंचित बहुजन आघाडीने ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केल्याचा परिणामही जाणवत आहे. त्यामु़ळे पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांनी सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे निर्माण केल्याचा परिणाम झाला नाही.
सावरकर हाच नवा मुद्दा
शिवगर्जना सभा यशस्वी झाली, याविषयी शंका नाही. मात्र, सभेत उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे विशेष लक्ष होते. त्यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिंदे गटावर शरसंधान केले. परंतु, आम्ही हिंदुत्व सोडले नाही, हे अधोरेखित करण्यासाठी आणि विरोधात असलेल्या हिंदुत्ववाद्यांना सडेतोड उत्तर म्हणून सावरकरांवरुन थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खडा सवाल करुन, सावरकरांचा अवमान सहन करणार नाही, असा इशारा दिला. हा एक नवीन मुद्दा मांडल्यानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटेल, ही एक अपेक्षा ठाकरे विरोधकांची होती. परंतु, काँग्रेसने सावरकरांविषयी दोन्ही पक्षांची भूमिका जगजाहीर असल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला. केवळ सावरकरांवरुन वेगळे व्हायचे नाही, असे काँग्रेसने ठरविलेच आहे. भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याने ठाकरे यांचा इशारा काँग्रेसने मनावर घेतला नाही. सावरकरांवरुन राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क साधून शिवसेनेनेही सावध पवित्रा घेतला.
स्थानिक मुद्दे दुर्लक्षित
धनुष्यबाण चोरला, मिंधे गट, मोदी म्हणजे भारत नाही, निवडणुका घेण्याचे आव्हान, अदानी प्रकरण, ईडी-सीबीआयचा वापर इत्यादी मुद्दे काही नवीन नव्हते. काही स्थानिक मुद्यांना ठाकरे हात घालतील, अशी लोकांची अपेक्षा होती. त्यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका केली. पण, दादा भुसे यांना सोडून दिले. भुसे यांचा समाचार ते घेतील, अशी एक अपेक्षा लोकांची आणि अद्वय हिरे यांची होती. परंतु, तसे काही झाले नाही. भुसेंना महत्व द्यायचे नाही, असे ठाकरे यांनी ठरविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड सभा हाच भुसेंना इशारा असाही हिशेब ठाकरेंनी मांडला असावा.
मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आलेल्या अद्वय हिरे यांचेही फारसे कौतुकही त्यांनी केले नाही. सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणार्या हिरेंना आपली नाराजी लपविता आली नाही. स्थानिक मुद्यांवर ठाकरे यांनी बोलायला पाहिजे होते. परंतु, त्यांचे लक्ष राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणावर असल्याने त्यांनी शिंदें आणि त्यांचा गट, पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना लक्ष्य केले. मात्र, सभा अद्वय हिरे यांच्या पुढाकाराने झाल्याचे लोकांच्या लक्षात आहे. अद्वय हिरेंनी भुसेंची हवा टाईट केल्याची चर्चाही आहे. याचमुळे काही जुनी प्रकरणे बाहेर काढून अद्वय हिरे यांना चौकश्यांच्या कचाट्यात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे सभेनंतर स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपात असताना अद्वय हिरेंची जुनी प्रकरणे बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला नाही. सत्तेच्या बाजूला आणि सत्तेच्या विरोधात असल्याचा हाच, तर फरक असतो.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…