सोळाशे वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार होणार

सोळाशे वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार होणार
द्वारका : वार्ताहर
राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर 1659 जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागांकडे प्राप्त झाली आहे. त्यासंदर्भात विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती गठीत करण्यात आली असून, या समितीने आज आढावा घेतला.
राज्यातील, विभागातील, जिल्ह्यातील तसे ग्रामपंचायत, गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक गावांची नावे, वस्त्यांची, रस्त्यांची नावे जातिवाचक असल्याची बाब समोर आल्याने राज्यातील सामाजिक सलोखा व सुधारणा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने ही जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांची निगडित नावे देण्याबाबत समाजकल्याण विभागाने निर्णय घेतला आहे. शहरी क्षेत्रातील 190 तर ग्रामीण भागातील 1459, नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी सर्व महापालिका यत्रणांना दिले.

तृतीयपंथीयांना मानधन देण्याचा विचार

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कल्याण मंडळाचा देखील आढावा घेण्यात आला. नाशिक विभागात एकूण 603 तृतीयपंथीय असून त्यापैकी 363 तृतीयपंथीयांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण विभागात प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे विभागात 129 जणांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी यावेळी सांगितले. गमे यांनी तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच पुणे मनपा प्रशासनाने रुपये 3 हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर विभागातील मनपा प्रशासनाने देखील विचारा करावा अशा सूचना गमे यानी यावेळी दिल्या. यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नाबाबत उपस्थिताना माहिती करुन दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *