संदीप – वैभवच्या कविता
हा अनुभव खरंच अतिशय अविस्मरणीय आहे.. कवितांची प्रत्येक ओळ घेऊन जेव्हा संदीप-वैभव स्टेजवरून साद घालतात तेव्हा कविता नावाचे दिव्य हळुहळू आपल्यासमोर उलगडत जाते. या कविता, त्यातील भावना, प्रत्येक शब्द हा संदीप-वैभवचा नाही उरत मग. आपणही नकळत त्यात स्वतःला बघत राहतो. संदीपच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा कुठे आपल्यातलं नेटवर्क खऱ्या अर्थाने सुरू होतं. या कार्यक्रमाच्या प्रयोजनाबद्दल बोलताना ते म्हणतात – कुणीतरी काहीतरी सांगायला उत्सुक आहे आणि कुणीतरी काहीतरी ऐकायलाही उत्सुक आहे.. अशा सर्वांसाठी..!!
“बॅचलरच्या घरात मध्यभागी तरंगत राहाते आभाळ…
खिडकीबाहेर मान काढायची गरज राहात नाही त्याला…”
या सुरुवातीच्या संदीपच्या ओळींनीच आपल्यातला बॅचलर जागा होत जोरजोरात टाळ्या देतो. संदीपच्या शब्दात ताकद आहे. समोरच्याच्या मनाला भिडण्याचा प्रत्यय हरएक कवितेदरम्यान प्रेक्षकांच्या टाळ्यांमधून येत राहातो. संदीपसह आपलीही चलबिचल सुरू होते नि मनातच कल्पनांचं जाळं विणत तो म्हणतो…
“एकदा ती हसली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभरावर नोंद केवळ युगभरावर वंचना…
काय ती करते खुणा अन काय माझ्या कल्पना..”
लागलीच कॉलेज जीवनात घडणारे, घडलेले असे अनेक प्रसंग सर्रकन डोळ्यांसमोर येऊन जातात आणि मी बोलणारच होतो पण संदीप माझ्या जरा आधी बोलला या आविर्भावात आपण खुर्चीवर जरा ताठ बसतो. दीर्घ श्वास घेत तो म्हणतो…
“उभा आहे मस्त खुशाल,
थंडीच झालीय माझी शाल..!
काटा माझ्या अंगावर
गुलाब तिच्या गालांवर
कसा निघेल इथून पाय
वेड लागेल नाही तर काय…!!”
तिकडे भावनांना टिपण्याची जितकी क्षमता वैभवच्या कवितांमध्ये आहे; तितकीच त्याच्या आवाजातही आहे. कवितेत नेमक्या ठिकाणी घेतलेल्या त्याच्या प्रत्येक पॉजमधून कविता काळजापर्यंत उतरत जाते..
“हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही…”
वैभवचा शब्द मनाचा ठाव घेऊन जातो..
“छेदून निघाल्या भिन्न दिशेला वाटा
पण विभिन्न पायी रुततो एकच काटा
सल एकच सलते, कळते दोघांनाही
कळवळा असुनी हळहळायचे नाही”
अहाहा.. किती भारी लिहिलंय हे सारं.. ग्रेटच !!
कवितेबद्दल संदीपचं मत अतिशय साधं-सोपं… नि काळजाला भिडणारं आहे. तो म्हणतो…
“कविता म्हणजे असतेच काय
वाळूत मागे उरले पाय..!!
असे कधी चाललो होतो…
या शिवाय दुसरे काय…!!!”
कवितेबद्दलच्या या ओळी कानावर पडताच मन पुन्हा हळवं होतं. जुनं बरंच काही आठवतं…पहिली कविता… ती कशी सुचली ते… अन् पुस्तकाची पाने चाळावी तशा भराभर त्या आठवणी समोर येतात. जरी डोळे पाणावले तरीही एक सुखद, हळवा अनुभव आपल्या वाट्याला देऊन जातात. आवंढा गिळत जरा ध्यानावर यावं तर… वैभव त्याची कविता घेऊन तयार…
“कुठूनही तरंगत येतं एक नातं
आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं…
तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी ?
आलाय का हो गंध… काही उमलण्याही आधी?”
कसलं जबरदस्त लिहिलंय हे! कित्ती सुरेख शब्दांची गुंफण; हृदयाचा ठाव घेऊन जाणारी…
तुम्ही कोणत्याही वयोगटातील असलात तरी संदीप खरे – वैभव जोशीच्या कविता ऐकताना तुमच्या मनाला त्या भिडतातच आणि प्रत्येक वेळी नवा अर्थ सांगून जातात… जमलं तर तुम्हीही हा अनुभव नक्की घ्या, नक्कीच रिफ्रेश व्हाल !!!
अमोल जगताप
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…