मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना..
मनखेड : नासीर मणीयार
सरण ही थकले मरण पाहुनी..
मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळींची अनुभूती सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड येथे येत आहे. साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. साबरदरा येथे 8 जुलै रोजी एका वृद्ध महिलेचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी शेडच नसल्याने कुटुंबाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. साबरदरा येथील स्मशान भूमी कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तेथे जाण्यासाठी रस्ताही नसल्याने विशेषतः पावसाळ्यात हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत. हे ठिकाण नदीच्या काठावर असल्याने नदीला पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. वाघधोंड येथे स्मशानभूमी शेड आहे. मात्र साबरदरापासून तीन किलोमीटर दूर आहे त्यामुळे तेथे मृतदेह भर पावसात घेऊन जाता येत नाही. अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजूनही स्मशानभूमीची नसल्याने मृतदेहाला सुखाने अखेरचा निरोपही देता येत नाही. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते. काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वाघधोंड ग्रामपंचायतीत केवळ दोनच गावे समाविष्ट असून साबरदरा येथे अद्याप स्मशानभूमी शेड नाही.
वाघधोंड ग्रामपंचायत मध्ये साबरदरा व बंधारपाडा हि गावे आहेत. पैकी साबरदरा येथे स्मशानभूमी शेड उभारलेले नाही.त्यामुळे विशेषत पावसाळ्यात निधन झाले तर सरण रचायला अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने नाईलाजाने शेतातच अंत्यविधी उरकावा लागतो. ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल.
वसंत भोये.
जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीचे शेड तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात आला आहे.जागा खासगी मालकाची असल्याने कागदपत्राची पूर्तता करून काम सुरू करण्यात येईल. स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
विलास अहिरराव
ग्रामसेवक वाघधोंड.