शहरात जोर धार

गोदावरी दुथडी भरून वाहिली, दिवसभर संततधार
नाशिक : अश्विनी पांडे
शहरासह जिल्ह्यात काल शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे दिवसभरात 39.9 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे डोळे पावसाकडे लागले होते. जुलैचा पहिला आठवडा सुरू झाल्यानंतरही पावसाची कोणतीच चिन्हे नव्हती. मात्र, दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत होता. तथापि, काल सकाळपासूनच संततधार सुरू झाल्याने शहरातील रस्त्यांवरुन एकीकडे पाणी वाहत असतानाच नाल्यांमधील पाणीही गोदावरीला जावून मिळाल्याने काल गोदावरी दुथडी भरुन वाहिली. या हंगामातील हा पहिलाच पूर होता. त्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाने पाठच फिरवली. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या आगमनाकडे नागरिकांचे डोळे लागलेले असतानाच काल सकाळपासूनच संततधारेला सुरुवात झाल्याने नागरिक सुखावले. गोदावरीला येऊन मिळणार्‍या नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरीला येऊन मिळाल्याने गोदावरी दुथडी भरून वाहिली.
पेरण्यांना वेग येणार
जिल्हाभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे आता खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी शेतजमिन तयार करुन ठेवली होती. मात्र, पाऊसच नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. तथापि, आता जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पाणी कपात टळणार
गंगापूर धरणातील पाण्याचा साठाही कमालीचा खालावल्याने शहरावर पाण्याची कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, आता पावसाने चांगला जोर धरल्याने गंगापूर धरणातील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळले आहे.
गोदावरी दुथडी भरुन वाहिल्यामुळे सोमेश्‍वर येथील धबधबा खळाळून वाहत आहे. या धबधब्यावर नागरिकांची काल गर्दी होती. रविवारी आणखी गर्दीे होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे विजपुरवठाही काही भागात खंडीत झालेला ंहोता. तर शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे घरी जाताना विद्यार्थ्यांचे तसेच चाकरमान्यांचे हाल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *