नाशिक

सावरकर- एक आधुनिक चाणक्य

 

आर्य चाणक्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचे जीवनचरित्र अभ्यासले तर भर्तृहरीच्या “न्यायात्पथ: न प्रविचलन्ति धीरा:|” या धैर्यशील व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणाऱ्या सुवचनाची आठवण होते. आर्य चाणक्य यांचा कालखंड हा इ.स.पू.३७१ ते इ.स.पू. २८३ असा तर, सावरकरांचा कालखंड १८८३ ते १९६६ हा होता. तरीही दोघांच्या आयुष्यात, कार्यप्रणालीत अनेक साम्यस्थळे आहेत. प्रचलित व्यवस्थेवर नुसती टीका करुन न थांबता चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्य या शिष्याच्या मदतीने एक आदर्श राज्यव्यवस्था यशस्वीपणे उभारुन दाखवली. तर सावरकरांनी स्वतंत्र भारत कसा असेल ह्याचीही मांडणी केली. राष्ट्रकार्यासाठी फक्त विद्वत्ता असून चालत नाही; तर व्यवहारज्ञान, प्राप्त परिस्थितीचे अचूक आकलन,भविष्याचा वेध घेणारी दृष्टी, नेतृत्वगुण, आपला प्रतिस्पर्धी व त्याची व्यूहनीती ओळखण्याची क्षमताही असावी लागते हे चाणक्य आणि सावरकरांच्या उदाहरणातून आपल्याला दिसते.
चाणक्यांच्या वेळी मगध देशावर धनानंद राजाची एकाधिकारशाही होती; तर सावरकरांच्या काळात भारत देश पारतंत्र्यात होता. चाणक्य आणि सावरकर दोघांनीही आपापल्या काळात समाजजागृती करुन जनतेला गुलामगिरीची जाणीव करुन दिली. जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. दोघांमधील निर्भयता, धाडसी वृत्ती वाखाणण्याजोगी होती. तब्बल दोन जन्मठेपांची शिक्षा जाहीर झाल्यावर ‘५० वर्षे तुमचं सरकार तरी राहील काय?’ असे ब्रिटिशांनाच ठणकावून विचारणारे सावरकर म्हणजे नंदकुळाचा नाश करण्याची प्रतिज्ञा करुन अत्याचारी राजालाच आव्हान देणाऱ्या चाणक्यांचेच आधुनिक रूप!
जो देशाचा शत्रू असेल त्याला हरप्रकारे नामोहरम करायचेच असे सावरकर आणि चाणक्य दोघांचेही मत असल्याने ‘शस्त्राघाता शस्त्रचि उत्तर’ हेच दोघांचेही धोरण होते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे चाणक्य सूत्र सावरकरांनीही अंमलात आणले.
बुद्धीने लढणाऱ्या नीतीला चाणक्यनीती म्हणतात. मुळात चाणक्य म्हणजेच दूरदृष्टी,द्रष्टेपण! सावरकरांचंही द्रष्टेपण त्यांच्या विचार व कार्यातून वेळोवेळी जाणवतं. उदाहरणच द्यायचं झालं तर,” अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटं भारतीय सैन्याचे सामुद्रिक आणि वैमानिक नाके बनतील” हे सावरकरांचं भाकीत आज प्रत्यक्षात उतरलेलं दिसतंय.
सावरकर आणि चाणक्य दोघांनीही आपापल्या कालखंडात जी सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवून आणली,ती त्या त्या काळातल्या लोकांच्या कल्पनेपलीकडली होती. दोघेही प्रचलित व्यवस्थेवर नुसती टीका करुन थांबले नाहीत तर त्यांनी उत्तम पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करुन दिली.
दोघांनीही राष्ट्र घडवण्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. पण दोघांनाही सत्तेचा मोह नव्हता. चंद्रगुप्ताला सम्राटपद देऊन आर्य चाणक्य अध्यापनाचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तक्षशीलेला निघून गेले. तसंच सावरकरही स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सत्तेचं कुठलं पद न भूषवता जनजागृतीचं, राष्ट्र उभारणीचं कार्य करत राहिले. स्वतः सावरकरांच्याच शब्दांत सांगायचं तर ,” भारतीय प्रजासत्ताकाचा राष्ट्रपती हे भूषणास्पद स्थान प्राप्त होणे हे मोठे भाग्याचे आहे,यात शंका नाही. परंतु चंद्रगुप्ताला राज्यसिंहासनावर बसवल्यानंतर ,आर्य चाणक्याप्रमाणे सत्ता नि संपत्ती यांच्याकडे पाठ फिरवून सर्वस्व त्याग करणे हेही काही कमी भाग्याचे नाही. मोठमोठ्या आंदोलनांना प्रेरणा देऊन नि मार्गदर्शन करुन नंतर एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे शक्य तेवढे राष्ट्रकर्तव्य करीत निरिच्छ समाधानात राहणे यातही कृतार्थतेची धन्यतरता आहेच आहे.”

राष्ट्राचे नवनिर्माण झालेले दोघांनीही पाहिले. त्यात दोघांचेही मोलाचे योगदान होते‌. तरीही दोघांना सदैव टीकेचे धनी व्हावे लागले. चाणक्य नीती हा शब्द आजकाल उपहासाने वापरला जाऊन कपट नीती असा अर्थ काढला जातो तर सावरकरांना तथाकथित क्षमापत्रांवरुन विनाकारण दूषणे दिली जातात.
राष्ट्रं विश्वगुरुं पुन:|’ हे एकच स्वप्न पाहणाऱ्या चाणक्य आणि सावरकरांची चरित्रे अभ्यासल्यावर, परकीय भाषांचे ज्ञान व बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अंदाज असणारे, तरूणांना देशकार्यासाठी प्रेरित करणारे, कोणत्याही समस्येने चिंताक्रांत न होता येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत, विरोधकांनी भिरकावलेल्या प्रत्येक दगडाचा उपयोग करत आपल्या ध्येयशिल्पासाठी चिरेबंदी चौकट निर्माण करणारे सावरकर हे निश्चितच आधुनिक चाणक्य ठरतात!

– मधुरा घोलप

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

16 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

16 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

17 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

17 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

17 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

17 hours ago