सावकारीवर अंकुश हवाच!
भागवत उदावंत
खासगी सावकारांकडून होणार्या आर्थिक जाचाला कंटाळून मागील आठवड्यात सातपूरच्या शिरोडे कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. त्याअगोदर पाथर्डी फाट्यावर राहणार्या एका दाम्पत्याने सावकारांकडूनच होणार्या छळाला कंटाळून जीवनाचा शेवट केला. या दोन घटना केवळ चिठ्ठी लिहून ठेवल्यामुळे उघड झाल्या. इतर आत्महत्या या बर्याचदा उजेडातही येत नाही.
खासगी सावकारकीच्या पाशातून जनतेची सुटका व्हावी म्हणून समाजधुरिणांनी बँकांची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून जनतेच्या गरजा भागाव्यात, गरज लागली तर वेळप्रसंगी कर्ज मिळावे हा खरा उदात्त हेतू होता. परंतु तरीही खासगी सावकारकीचे लोण काही कमी झालेले नाही. याला काही प्रमाणात बँकांचे किचकट नियम आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच गरज भागली जात नसेल तर खासगी सावकाराचे दार ठोठवावे लागते. खासगी सावकारकी करण्यासाठी सहकार खात्याच्या नियमानुसार परवाना घ्यावा लागतो. या दोन्ही घटनांत पाहिल्यास एकाकडेही खासगी सावकारकीचा परवाना नसल्याचे उघड झाले. शिरोडे कुटुंबाने खासगी सावकारांकडून 30 ते 35 लाख रुपये घेतल्याचे सांगितले जाते. खासगी सावकारांचा व्याजाचा दरही हा अव्वाच्या सव्वा असतो. बर्याचदा घर गहाण ठेवले आणि रकमेची परतफेड चक्रवाढ व्याजाने केली नाही तर घरावर देखील कब्जा करण्याचे प्रकार घडलेले आहेत. मुळात खासगी सावकारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तेवढी सक्षम नाही. आता हे प्रकरण घडल्यावर जागे झालेल्या सहकार खात्याने या खासगी सावकारांवर धाडी टाकल्या. 21 पैकी फक्त दहाच सावकारंपर्यंत पोलिस यंत्रणा पोहचू शकली. उरलेल्या सावकारांचा शोध अजूनही संपलेला नाही. अर्थात जे दहा जण सावकार ताब्यात घेतले होते. त्यांना बचावाची पुरेशी संधी पोलिसांच्या ढिसाळ तपास यंत्रणेमुळेच मिळाली. नाशिकमध्ये पोलीस यंत्रणेचा पाहिजे तसा वचक दिसून येत नाही. टवाळखोरांनी संपूर्ण शहरभर उच्छांद मांडला आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील कोयता गँगने सामान्य माणसांचे जिणे अवघड करून टाकले आहे. सातपूर, सिडको भागात तलवारी आणि कोयताधारी पोलिसांनाच वाकुल्या दाखवित आहेत. मागील आठवड्यात सातपूरला वाहनांच्या काचा फोडणारा पकडला. सकाळी त्याची धिंड काढली आणि दुपारी जामीनावर बाहेरही आला. यावरून पोलिसांच्या तपासावरच संशयाचे ढग दाटत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने कळस गाठल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविषयी थेट विधानभवनात आवाज उठविल्यानंतर त्यांच्यावर पोलीस खात्याने नियंत्रण मिळविले. त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. ही बदली झाल्याचे समजल्यावर पोलीस ठाण्याच्या आवारातच फटाके फोडण्यात आले. यावरून देशमुख यांच्याविषयी तेथील कर्मचार्यांमध्ये देखील कशी खदखद होती. हे उघड झाले. सिडको, सातपूर भागात परप्रांतीयांनी बर्यापैकी बस्तान बसविलेले आहेत. त्यांना स्थानिकांची साथ मिळाल्याने त्यांचे कारनामे वाढीला लागले आहे. भंगार बाजार उठविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, त्यात काही यश आले नाही. शहरात एकीकडे गुन्हेगारी कारवाया थांबत नसताना खासगी सावकारकीच्या आडून छुपी गुन्हेगारी उदयास येत आहेत. व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी देणेकर्याला जेरीस आणणार्या खासगी सावकारांवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. सामान्य नागरिकांना कधीही पैशांची गरज लागते. त्यातून खासगी सावकारांचे चांगलेच फावते. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून पैशांची वसूली करणार्या खासगी सावकारांबद्दल बोलायचीही हिम्मत कुणी करत नाही. मध्यंतरी कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले. रोजगार गेले. त्यातून उधार उसनवार करुन गुजराण करणार्या सामान्य पीडितांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. मात्र, कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने आर्थिक गणित बिघडले. कर्जाचा आकडा फुगत गेला. त्यामुळे देणे मुश्किल झाल्याने अनेकांनी होणार्या छळाला कंटाळून जीव देणे पसंत केले. अनेक जण कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून व्याजाने पैसे देत असले तरी उसने दिल्याचा आव आणतात. त्यामुळे कायद्यापुढे अशा केसेस तग धरु शकत नाही. सातपूरच्या प्रकरणातही काहीसे असेच झाले. ज्यांना सावकार म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांनी तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली. सातपूर पोलिसांनी देखील या प्रकरणात ज्या गांभीर्याने तपास करणे गरजेचे होते. तेवढे गांभीर्य दाखविले असते तर कदाचित सावकारांना काही प्रमाणात का होईना चाप बसला असता. दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही बाबही लक्षात घेणे गरजेची आहे.
जगात सर्व प्रकारचे सोंग करता येते, परंतु पैशांचे सोंग करता येत नाही. असे म्हटले जाते. आर्थिक गरज ही प्रत्येकालाच लागते. ज्यांचे सिबील रेकॉर्ड चांगले असते ते बँकांचा पर्याय अवलंबतात. परंतु, हातावर पोट असणारे आणि गहाण ठेवण्यासाठी काही नसणारे सामान्यजन खासगी सावकारकीच्या जाळ्यात अडकतात. त्यातून हे सावकार त्यांचे जिणं मुश्कील करून टाकतात. त्यातूनच अशा आत्महत्येच्या घटना घडतात. हे सगळे टाळता येणे शक्य नाही का? सहकार खाते नेमके करते काय? त्यांना खासगी सावकारांवर नियंत्रण मिळविणे शक्य नाही का? या सार्या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…
वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…
भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…
पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…
शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…
मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…