चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

शाळा प्रवेशोत्सवाची शहरासह ग्रामीण भागातही धूम

नाशिक : प्रतिनिधी
पालकांचा उत्साह, आनंद, अगतिकता, चिंता, बालकांची रडारड, हुंदका, मुलांना आकर्षक भेटवस्तू, खेळ व खाऊ देत नवागतांचे स्वागत, तसेच मुलांच्या स्वागतासाठी केलेली तयारी, विविध उपक्रमांमुळे भारावलेले पालक, आपल्या पाल्याचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्याची धडपड, त्यासाठी फोटो-व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मोबाइलच्या कॅमर्‍यात टिपणारे पालक, असे काहीसे चित्र सोमवारी (दि. 15 जून) शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाहावयास मिळाले. निमित्त होते, शाळेच्या पहिल्या दिवसाचे.
दोन महिन्यांच्या दीर्घ सुटीनंतर सोमवारी (दि. 15 जून) शहर व उपनगरांतील शाळा चिमुकल्यांच्या उपस्थितीने गजबजल्या. नवागतांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. दुसरीकडे, आपल्या पाल्याला आपल्यापासून वेगळे करताना पालकांचा ऊर भरून आला असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.
यावेळी जिल्हा, तालुका व गटस्तरावर कार्यशाळांचे आयोजन केले होते. शाळा प्रवेशोत्सव खर्‍या अर्थाने आनंदोत्सव ठरावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह जिल्ह्यातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या सर्व शासकीय अधिकार्‍यांनी शाळांना भेटी दिल्या.
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी नाशिकमधील विविध शाळांनी नवनवीन उपक्रमांचे आयोजन केले होते.
सकाळपासून शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते. रंगीबेरंगी फुगे, तोरणे, पताका लावून शाळा सजविण्यात आल्या होत्या. याप्रसंगी प्रभातफेरी काढण्यात आली होती.लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांच्या हातात शिक्षणविषयक जनजागृतिपर फलक धरण्यात आले होते. शाळा आवार आणि बाहेर सकाळपासून स्कूलबस, रिक्षा व पालक यांनी गर्दी केली होती.
वर्गात येणार्‍या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. त्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. काही शाळांनी परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थ्याचे नाव त्या झाडाला देण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना आपले जुने मित्र/मैत्रिणी भेटल्याने आनंदाला भरते आले होते.

 

 

Schools bustling with the chirping of little ones.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *