गळक्या, धोकादायक इमारतीत शाळा भरू नये

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जि. प. शिक्षणाधिकार्‍यांचे निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची तातडीने तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांनी दिले आहेत.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तसेच मनपा शिक्षण विभागाला पाठविलेल्या पत्रानुसार, शाळांच्या छत, भिंती, व्हरांडे यांना गळती असल्यास त्या भागात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. इमारतींमध्ये भेगा किंवा संरचनात्मक नुकसान आढळल्यास अभियंत्यांकडून तपासणी करूनच वापर करावा. धोकादायक इमारती व वर्गखोल्या तातडीने बंद करून परिसर सुरक्षित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्युत यंत्रणा, स्विच, तारा, पंप यांची तपासणी करून मुख्य वीजपुरवठा सुरक्षित ठेवावा, वीज कडाडत असताना विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली जाण्यास मनाई करावी, तसेच अतिवृष्टी किंवा वादळी वार्‍याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा परिसरातील धोकादायक झाडे, तुटलेल्या फांद्या, पाणी साचलेली ठिकाणे, घसरडे मार्ग आणि उघड्या विहिरी यांची तातडीने दुरुस्ती किंवा सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही नमूद करण्यात
आले आहे.
याशिवाय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसराचे निर्जंतुकीकरण, प्रथमोपचार पेटी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराची तपासणी, हिरवे कुंपण, तसेच विद्यार्थ्यांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी सूचनाफलक व बॅरिकेड्स उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींची तातडीने अंमलबजावणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांनी
दिले आहेत.

Schools should not be held in leaking, dangerous buildings.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *