शिंदे गटानेही लिहून घेतले समर्थनपत्र !

 

यवतमाळ :

शिवसेनेत आमदारांचे बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आमदार व शिवसैनिकांकडून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून घेतले गेले . त्याच धर्तीवर आता शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या समर्थकांकडून काल ‘ समर्थनपत्र ‘ लिहून घेण्यात आले . राठोड समर्थकांच्या शनिवारी यवतमाळात झालेल्या बैठकीत साध्या कागदावर समर्थकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या . संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत काल शनिवारी यवतमाळ येथे पार पडली . यावेळी फाटक म्हणाले , लोकशाहीमध्ये जिकडे बहुमत तिकडे निवडणूक चिन्ह असे संकेत आहेत . त्यामुळे ‘ धनुष्यबाण ‘ हे चिन्ह शिंदे गटाकडेच राहणार असून , याच चिन्हावर येणारी नगर परिषद , नगरपंचायत , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक लढणार आहोत . संजय राठोड यांच्यासोबत जिल्ह्यातील किती पदाधिकारी , लोकप्रतिनिधी आहेत , याची चाचपणी करण्यासाठी नगरसेवक राजेंद्र फाटक काल यवतमाळात दाखल झाले होते . या चाचपणीनंतर शिवसेनेची विद्यमान जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून शिंदे समर्थकांमधूनच नवीन कार्यकारिणी घोषित होणार असल्याचे फाटक यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *