संपादकीय

श्री गुरुदेव दत्त

दत्तशब्दे वरलाभ ।
दत्तची नाम ठेविले सुलभ ।
विधि शंकर पद्मनाभ ।
जन्मा आले ऐक्यत्वे ॥
त्रिगुणात्मक अवतार ।
वैराग्यशील दिगंबर ।
परमहंस दीक्षा थोर ।
जगदोद्धारा अवतरले ।
कलीमाजी दत्तोपासना ।
सद्य:फलदायक जाणा ।
आर्धिव्याधि पीडित जनां ।
सुखदायक तात्काळ ॥
श्रीगुरुलीलामृतात श्रीदत्तांचा अवतार घेण्याचा उद्देश वरीलप्रमाणे दिला आहे. दत्तावताराबद्दल निरनिराळ्या पुराणांतून निरनिराळ्या कथा आढळतात. शिवपुराण, शतरुद्रसंहिता यामधील कथेनुसार अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी त्रक्षकुल पर्वतावर तपश्चर्या केली. त्या घोर तपश्चर्येमुळे त्यांच्या मस्तकातून ज्वाला निघून त्रैलोक्याचा दाह होऊ लागला. त्यावेळी सर्व देव तिथे आले आणि त्यांना त्यांनी अत्री ऋषींना ब्रह्मा, विष्णू व शंकर यांचा अंशरूप पुत्र होईल असा वर दिला. या आशीर्वादाने अत्री ऋषींना अनसूयेच्या पोटी जो पुत्र झाला तेच दत्त होय. दुसर्‍या एका कथेनुसार ब्रह्मा, विष्णू व शंकर हे अत्री ऋषींची पतिव्रता पत्नी अनसूया तिचे सत्त्वहरण करण्याकरिता आश्रमात आले असता, अनसूयेने पतीच्या चरणांचे तीर्थ त्यांच्या मस्तकांवर शिंपडले व त्यामुळे हे तिघेही देव बालकस्वरूप झाले. पुढे तिन्ही देवांच्या पत्नी अनसूयेकडे आल्या व आपापले पती परत मागू लागल्या तेव्हा अनसूयेने तीन बालके त्यांच्यापुढे ठेवली. त्यांना आपापले पती ओळखता येईनात. तेव्हा अनसूयेने पुन्हा त्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून दिले. तेव्हा या तिन्ही देवींनी अत्री ऋषीस वर मागण्यास सांगितले. त्यावर तुम्ही तिघांनीही पुत्ररूपाने माझ्या घरी यावे, असा त्यांनी वर मागितला, नंतर जो पुत्र अत्री ऋषी व अनसूया माता यांना झाला तेच श्रीदत्त होय.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर दत्तजन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केल्या जातो. श्रीदत्तांनी सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार धारण केला. श्रीदत्तांना सर्वसामान्यरीत्या ’त्रिमुखी’ मानलेले आहे. काशी व पंढरपूर येथे एकमुखी दत्तांचीसुद्धा मूर्ती आहे. दत्तांची तीन मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश असून, मागील गाय आणि चार कुत्री ही अनुक्रमे पृथ्वी व चार वेद यांचे सूचक मानली जातात. दत्तात्रेयांनी अत्री ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून ‘योगसिद्धी’ आणि ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त केले. त्यांचा आश्रम सिंहाचलाजवळ प्रयाग वनात असून, गुरुदेव दत्त स्वेच्छाविहारी होते. पृथ्वीतलावर शांतता स्थापित करण्याकरिता भगवान श्रीदत्तात्रेयांनी सर्वत्र भ्रमण केले. एकांतप्रेमी श्रीदत्त औदुंबर वृक्षाखाली बसून सृष्टी नियमांचे चिंतन करायचे.
भागवताच्या एकादश स्कंधात 7 ते 9 या अध्यायांत अवधूताने म्हणजेच श्रीदत्ताने केलेल्या 24 गुरूंची कथा आहे.
जो जो जयाचा घेतला गुण ।
तो तो म्या गुरू केला जाण ॥
गुरुसी केले अपारपण ।
जग सर्वत्र गुरु दिसे॥
यादवांचा पूर्वज यदु याने अवधुतास परमानंद कुठून कसा मिळाला, हे विचारल्यावरून अवधुताने आपल्या 24 गुरूंची नामावली सांगून कोणता गुण कोणापासून घेतला तेही सांगितले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून काही तत्त्वे त्यांनी ग्रहण केली. पशुपक्ष्यांपासून काही गुण घेतले. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, गजेंद्र, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा वेश्या, टिटवी, बालक, कंकण, कारागीर (शतकार), सर्प, कोळी, कुंभारीण माशी असे 24 गुरू दत्तात्रयांनी केले.
अवधुतांच्या मते संसार तरून जाण्यास मुख्य सद्बुद्धी पाहिजे. जगातील प्रत्येक वस्तूंपासून काही शिकण्यासारखे खास आहे. जगच गुरुरूप आहे, हे मानल्यामुळे अवधुतांना निजानंद कसा प्राप्त झाला व स्वावलंबनाने आत्मोद्धार कसा करून घ्यावा, हेही बोधप्रदा कथा शिकवते. एकनाथ महाराजांनी यावर फार मनोरम भाष्य केले आहे, असा उल्लेख सापडतो.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुण अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेति नेति शब्दें न ये अनुमाना ।
सुरवरमुनिजन योगिसमाधि न ये ध्याना॥
संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या आरतीमध्ये दत्ताच्या स्वरूपाबद्दल वरील वर्णन आहे, यावरून दत्तांचे स्वरूप त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे ऐक्यदर्शन व त्रैमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवतांचे एकवट रूप होय, हे स्पष्ट होते. देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. ते तर त्रैलोक्याचा राणा, शब्दातीत आहे, असे नाथ महाराज म्हणतात.
श्रीदत्तांच्या मनापासून केलेल्या उपासनेने आपल्या समस्यांचे हरण होते. त्यांच्या प्रेमळ मूर्तीचे दर्शन घेतल्यास आपले मीपण गळून पडते आणि मनात आपसूक सात्त्विक भाव उमलत असल्याची अनुभूती येते.
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, तसेच दत्त माउली आपल्या संकटांचा समूळ नाश करतात, अशी मान्यता आहे. दत्तगुरूंच्या अखंड कृपेसाठी संबंधित दत्तक्षेत्राला अथवा गाणगापूर जाऊन महाराजांचे दर्शन घेणे, गुरुचरित्र पारायण करणे आवश्यक असल्याचे मानले जाते.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago