गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करा

एक खिडकी योजनेची मागणी; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक परवानग्या एक खिडकी योजनेतून एकाच ठिकाणी आणि वेळेत देण्यात याव्यात, तीन वर्षे पूर्ण झालेल्या मंडळांना तातडीने परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने पोलीस आयुक्तांंकडे केली आहे. महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून, विविध 13 मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन सार्वजनिक गणेश मंडळांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती स्थापना तर 25 सप्टेंबर रोजी विसर्जन होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस, महापालिका, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरणच्या अधिकार्‍यांची एकाच ठिकाणी व्यवस्था करून सर्व परवानग्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत सुरू ठेवण्यासह पारंपरिक वाद्यांना परवानगी द्यावी. आगमन सोहळ्यांच्या ठिकाणी वाहतूक मार्गात आवश्यक बदल करून वाहतूक पोलीस व पोलीस बंदोबस्त द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने गणेशमूर्ती बसविण्याची जागा बदलण्यास परवानगी द्यावी व रस्त्यांवरील रबरी गतिरोधक काढावेत, देखावे रात्रभर सुरू मात्र रात्री 12 नंतर ध्वनिव्यवस्था बंद ठेवून देखावे व प्रकाशयोजना सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असेही निवेदनात नमूद आहे.
मंडळांना कागदपत्रांसाठी अडवणूक करू नये, स्थानिक पोलीस ठाण्यांना परवानगीचे अधिकार देण्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी मंडळांच्या बैठकीत उपस्थित राहावेत, अशीही मागणी आहे. गणेश मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती करून त्यांचा संपर्क क्रमांक सर्व मंडळांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महामंडळाने केली आहे. महामंडळाच्या कार्यकारी मंडळात वसंत गिते, विनायक पांडे, राजेंद्र बागूल, गजानन शेलार, रामसिंग बावरी, लक्ष्मण धोत्रे, पोपटराव नागपुरे, गणेश बर्वे, सत्यम खंडाळे, बबलू (महेंद्र) परदेशी, महेश महंतकाळ, विजय ठाकरे, अक्षय खांडरे आणि कैलास मुदलियार यांचा समावेश आहे. निवेदनावर अध्यक्ष समीर शेटे यांची
स्वाक्षरी आहे.

Simplify the permission process for Ganeshotsav.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *