बहिणीच्या लग्नाआधीच भावाचा मृत्यू

बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना एकुलत्या एक भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिन्नर तालुक्यातील दातली येथे ट्रॅक्टर पलटी होऊन १८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या दोनच दिवसांवर बहीणीचे लग्न येऊन ठेपले असल्याने सर्वत्र आनंदी आनंद असलेल्या घरात अचानक घडलेल्या दुर्घटनेने आश्रुंचे पाट वाहू लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी (दि.२०) दुपारी शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल चारीत कोसळला आणि पलटी झाला. यात चालकाच्या बाजूला बसलेला ओमकार चिंतामण चांदोरे (वय १८) याचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला.
मयत ओमकार चांदोरे याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद इप्पर, सचिन काकड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *