आरोग्य विज्ञान विद्यापीठात ठिय्या आंदोलन

नाशिक ः प्रतिनिधी
पुण्यातील सिंहगड दंत (डेंटल)
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अन्य महाविद्यालयांत सक्तीने स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी व पालकांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सोमवारी (दि.13) ठिय्या आंदोलन केले. नियोजित बैठक अचानक रद्द झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे राज्यातील विविध महाविद्यालयांत स्थलांतर सुरू केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठ परिसरात ठिय्या दिला.
महाविद्यालयात सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, शैक्षणिक व क्लिनिकल कामकाज सुरळीत सुरू असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. आवश्यक सुविधा, अनुभवी शिक्षक व चांगला क्लिनिकल एक्सपोजर उपलब्ध असतानाही अचानक स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही विद्यार्थ्याने किंवा पालकांनी स्थलांतराची मागणी केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, प्राध्यापक व कर्मचार्‍यांचे वेतन प्रलंबित असल्याने महाविद्यालयात वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाने या संस्थेची संलग्नता रद्द केली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे. सोमवारी (दि. 13) होणारी बैठक अचानक रद्द केल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पालकांना कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने नाराजी वाढली. स्थलांतराचा मुद्दा न मांडण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही पालकांनी केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मध्यस्थीचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना यश आले नाही. याबाबत सिंहगड डेंटल कॉलेजचे प्राचार्य समीर पाटील यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे टाळले.

Sit-in protest at the University of Health Sciences

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *