मिरगावातील बंगल्याची तपासणी; याच ठिकाणाहून आधी रिव्हॉल्व्हर, काडतुसे जप्त
सिन्नर : प्रतिनिधी
महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ बाबा अशोक खरात याच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथील ‘ब्रह्मसदन’ या आलिशान बंगल्यावर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी (दि.24) रात्री अचानक धडक दिली. न्यायालयात खरातला हजर केल्यानंतर एसआयटीचे नाशिक पथक थेट मिरगाव येथे दाखल झाले आणि ईशानेश्वर मंदिर परिसरातील या बंगल्याची सखोल पाहणी केली.
यापूर्वी पोलिसांनी याच बंगल्यावर झडती घेतली असता एक रिव्हॉल्व्हर, 12 जिवंत काडतुसे आणि पाच वापरलेली काडतुसे जप्त केली होती. त्यामुळे या ठिकाणाच्या हालचालींकडे तपास यंत्रणांचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, एसआयटीचे पथक रात्री उशिरापर्यंत परिसरात तपास करत होते. चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले का, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, खरातच्या संपर्कातील व्यक्ती, मंदिर परिसरातील हालचाली तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक खोलात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
SIT raids ‘Captain’ Kharat’s Brahma Sadan at midnight