नाशिकरोड : वार्ताहर
येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस यांनी सामाजिक दायित्व निधीतून सांजेगाव, काळुस्ते, कोनांबे, पंचाळे, किर्तांगळी आणि गंगाम्हाळुंगी या सहा गावांना 46 लाखांच्या प्रत्येकी एक अशा सहा घंटागाड्या ग्रामपंचायतींना प्रदान केल्या आहेत. खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत प्रेस महामंडळाच्या नवी दिल्लीतील मुख्य व्यवस्थापकीय संचालिका तृप्तीपात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू यांच्या हस्ते सरपंचांना प्रदान करण्यात आल्या.
प्रेसच्या यू. एस. जिमखाना येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, सहसचिव इरफान शेख, अशोक जाधव, अविनाश देवरुखकर, राहुल रामराजे, बबन सैद, महाव्यवस्थापक व्यंकटेश कुमार, संयुक्त महाव्यवस्थापक विनोद महरिया, महेश बन्सल, व्यवस्थापक अनुराधा कारळकर, व्ही. पी. काला आदी उपस्थित होते. सरपंचांनी गावातली स्वच्छता करून ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राखून स्वच्छ भारत, निरोगी भारत असे अभियान राबवावे, असे आवाहन तृप्तीपात्रा घोष यांनी केले. प्रेसने सीएसआर फंडातून यापूर्वीही अंजनेरी येथील आधाराश्रमाला पाण्याची टाकी व जलवाहिनी दिलेली आहे. या आधाराश्रमात आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या निराधार मुलांचे संगोपन केले जाते. तसेच सिन्नर येथे साठ लाखांची तर घोटीला पन्नास लाखांची अद्ययावत अभ्यासिका व ग्रंथालय तयार करून दिले आहे.
दत्तमंदिर रोडवरील दिव्यांग मुलांच्या शाळेला स्कूल बस, बिटको रुग्णालयाला रक्तपेढीसाठी तर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयास सोनोग्राफी मशिनकरिता चार कोटींचा निधी दिलेला आहे. यावेळी खा. हेमंत गोडसे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य कायम उत्तम राहावे यासाठी मी पाठपुरावा करून प्रेसच्या सीएसआर फंडातून या घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने कचर्याचे संकलन नियोजनपूर्वक करून गाव कचरामुक्त करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असेही गोडसे म्हणाले.