शंकरराव वाघ : आगामी काळात पाच हजार कामगारांना भांडे वाटपाचे नियोजन
निफाड : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नाशिक यांच्या सहकार्याने गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील व खास करून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड, येवला या तालुक्यांतील ग्रामीण भागात साडेसात हजार कामगारांना हजारो रुपये किमतीचे घरगुती साहित्य व भांडेवाटप करण्यात आले आहे. अजूनही हे काम युद्धपातळीवर सुरूच आहे. जवळपास तेरा हजार कामगारांना भांडे वाटपाचा लक्ष्यांक लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पी. एम. विश्वकर्मा शासकीय समितीचे सदस्य भाजपचे शंकरराव वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यापैकी भांडे (गृहोपयोगी साहित्य) वाटप योजना ही एक महत्त्वाची सामाजिक सहाय्य योजना मानली जाते. या योजनेमागील धोरणात्मक उद्दिष्टे केवळ भांडी देण्यापुरती मर्यादित नसून, कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा व्यापक हेतू आहे. मंडळाकडे नोंदणी करून नियमित नूतनीकरण करणार्या कामगारांना लाभ देण्यात येतो. भांडे वाटप योजनेचे धोरण हे केवळ भौतिक वस्तूंचे वितरण नसून, बांधकाम कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व मानवी विकासाला चालना देणारे व्यापक कल्याणकारी धोरण आहे. निफाडमध्ये याबाबत अंमलबजावणी केली जात असून, याकामी गौरव वाघ, शिवम गवळी, रूपाली पराळकर, वैभव निरभवणे, कांचन पवार, विठ्ठल गांगुर्डे, पूनम जावरे, अनिता जमधडे आदींसह कामगार मंडळ व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री आकाश फुंडकर, कामगार उपायुक्त वि. ना. माळी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील कामगार व असंघटित-संघटित कामगारांपर्यंत शासनाची योजना पोहोचली पाहिजे, यासाठी घरगुती साहित्य व भांड्यांचे सेट वाटप सुरू आहे. अद्यापपावेतो हजारो कामगारांना हे सेट वाटप करण्यात आले. आगामी काळात मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत पाच हजार कामगार व नागरिकांना एकाच वेळी भांडे साहित्य वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे.
– शंकरराव वाघ, जिल्हाध्यक्ष, संघटित कामगार संघटना, नाशिकनाशिक जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या तळागाळातील कामगारांच्या हितासाठी शासन काम करीत आहे. शासनाच्या माध्यमातून कामगार संघटनेचे नेते शंकरराव वाघ यांनी घरगुती साहित्य व भांडेवाटप करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे, त्याबद्दल सर्व आदिवासी समाजबांधव त्यांचे आभार मानत आहे.
– भास्कर खोटरे, हिरडी, ता. त्र्यंबकेश्वर
So far, seven and a half thousand workers in the district have been provided with pots.