काळाराम मंदिर; ‘त्या’ विश्वस्तांची नियुक्ती बरखास्त करा

आ. ढिकलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, गैरकारभारासह दमदाटीच्या तक्रारी

नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांची पिढ्यान्पिढ्या निःस्वार्थ सेवा करणार्‍या पुजारी परिवारावर नवनियुक्त विश्वस्तांकडून अन्याय व दमदाटी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच विश्वस्त शुभम मंत्री व मिलिंद तारे यांची नियुक्ती तत्काळ बरखास्त करून नवीन पारदर्शक पद्धतीने विश्वस्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
केली आहे.
आ. ढिकले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मंदिरातील विश्वस्त शुभम मंत्री व मिलिंद तारे यांच्याकडून पुजारी, विश्वस्त तसेच इतर सदस्यांना विश्वासात न घेता त्यांना दमदाटी करण्याबरोबरच परस्पर ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कामकाजात हस्तक्षेप व गैरप्रकारांबाबत गंभीर तक्रारी नोंदविल्याची माहिती उपलब्ध आहे. मात्र, तरीही अशा व्यक्तींची धर्मादाय आयुक्तांकडून पुन्हा नियुक्ती करणे, हा गंभीर प्रकार असल्याचे आ. ढिकलेंनी म्हटले. दरम्यान, मंदिरातील पुजारी परिवार हा श्रीराम मूर्तीचा मूळ सेवेकरी असून, वंशपरंपरेने ते मंदिरातील त्रिकाल पूजा, सण-उत्सव, तसेच दैनंदिन धार्मिक विधी व नैवेद्याची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार
पाडत आहेत.
मात्र, सध्याच्या विश्वस्त मंडळातील काही वादग्रस्त सदस्यांच्या कारभारामुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत आहे. पुजारी परिवार, तसेच इतर विश्वस्तांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः विश्वस्त शुभम मंत्री व मिलिंद तारे यांच्याकडून पुजारी विश्वस्त, तसेच इतर सदस्यांना विश्वासात न घेता, दमदाटी करून परस्पर ठराव मंजूर करण्यात येत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. पुजारी परिवारास मिळणारे नियमानुसार नैवेद्य मानधन बंद करणे, मंदिराच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करणे, धर्मादाय आयुक्तांकडून नियुक्त झालेले विश्वस्त मंदार जानोरकर यांचे नाव काहीही कारण नसताना, हेतुपुरस्सर विश्वस्तांच्या नावाच्या फलकावरून वगळणे तसेच पुजारी परिवाराच्या परंपरागत अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न सातत्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश देऊन पुजारी परिवार तसेच इतर विश्वस्तांचे परंपरागत अधिकार व मंदिराची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी आ. ढिकले यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिराची प्रशासकीय योजना तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 11 विश्वस्तांचा समावेश आहे. यात जिल्हा व सत्र न्यायाधीश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वंशपरंपरागत पुजारी परिवारातील तीन प्रतिनिधी, पूर्वीच्या विश्वस्त मंडळातील तीन प्रतिनिधी, तसेच धर्मादाय आयुक्तांंकडून नियुक्त चार प्रतिनिधी, असे विश्वस्त मंडळाचे स्वरूप आहे.

श्री काळाराम मंदिरातील नवनियुक्त विश्वस्तांंची नियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांच्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या विश्वस्तांचा मनमानी कारभार, गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
– आ. राहुल ढिकले, नाशिक पूर्व

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *