शहरात सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद
नाशिक : अश्विनी पांडे
सोन्याचे भाव 52 ते 54 हजारांच्या दरम्यान गेले असताना चोरट्यांची मात्र दिवाळी होत आहे. वाढलेल्या भावामुळे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हजारो रुपयांच्या मुद्देमालावर चोरटे डल्ला मारत असल्याने चोरट्यांची एकप्रकारे दिवाळीच होत आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खून, बलात्कार, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा जरब आहे की नाही, असा प्रश्न सतत घडणार्या गुन्हेगारीच्या प्रकारामुळे निर्माण झाला आहे. त्यात चेन स्नॅचिंग प्रकाराने तर शहरात सोने घालून फिरणे नागरिकांना कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या चेन स्नॅचिंगचा प्रकारामुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सोन्याला आलेल्या झळाळीमुळे चोरटे सोन्यावर डल्ला मारत आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी यांसारख्या गोष्टी ओरबाडण्यात येत आहेत. तसेच पर्स, मोबाइल या गोष्टीही ओरबाडून नेल्या जात आहेत. त्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याला आता प्रतितोळा 50 हजारांहून अधिक भाव आहे. परिणामी चोरांकडून हीच बाब लक्षात घेत सोने चोरले जात आहे. अनलॉकनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दररोज शहरातील विविध भागात दररोज तीन ते चार चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. या घटना कमी वर्दळ असलेल्या ठिकाणासोबत वर्दळीच्या ठिकाणीही घडत असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूर रोड या कमी वर्दळीच्या भागात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढते आहे. तर सातपूर आणि अंबड या एमआयडीसी भागात तर रात्री आणि दिवसाही चेन स्नॅचिंग, मोबाइल आणि पैसे काढून घेण्यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे आधीच कोरोनानंतर महागाईचा सामना करणार्या नागरिकांना कष्टाने जमवलेल्या सोन्यावर चोर ताव मारत असल्याने जगायचे कसे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. परिणामी, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनाही नाशिक शहर क्राईम कॅपिटल बनतय की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.