संपादकीय

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्पष्ट आणि परखडपणे विरोध करणार्‍या लेखिका म्हणून दुर्गा भागवत ओळखल्या जातात. वैविध्यपूर्ण असे लेखन दुर्गा भागवत यांनी केले असून, लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. विविध देशातील संस्कृतीचा आणि भाषांचा अभ्यास होता. व्यासपर्व हा त्यांचा महाभारतावरील संशोधनात्मक ग्रंथ जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व पैसे या त्यांच्या ललित ग्रंथ लेखसंग्रहास आहे. 1970 मध्ये प्रकाशित झालेल्या पैस या ग्रंथाला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार 1971 मध्ये मिळाला.
पैसाचा खांब या लेखामध्ये ज्ञानोबांचा खांब म्हणून ओळखल्या जाणार्‍या खांबाला टेकून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या खांबाला पैस या नावाने ओळखले जाते. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज इतकी शतके मराठ्यांच्या घराघरांत फिरते आहे. भजन-दिंड्यात गाजते आहे, असे लेखिका म्हणतात त्यावेळी ज्ञानेश्वरीतील विचार आणि जीवनशिक्षण यावर वारकरी संप्रदायाची भिस्त असून, महाराष्ट्र त्या वहिवाटेवर मार्गक्रमण करत आहे, असे त्यांना म्हणायचे असते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केलेला महाशून्याचा संदर्भ आणि बौद्ध धर्मातील तत्त्वप्रणाली यातील साधर्म्य लेखिकेने दाखवून दिले आहे. त्यातच काही ठिकाणी महाशून्य, सहनसिद्धी, दुःख-कालिंदी या शब्दांच्या उलगड्यासह ज्ञानमित्र या शब्दाचा उलगडा त्यांनी केला आहे.
ज्ञान हे सूर्याप्रमाणे प्रखर व तेजस्वी आहे, सृष्टीला आधारभूत आहे. उपासनीय आहे, ध्येयस्वरूप आहे, एवढा अर्थ आहे एका छटेत स्थूलपणे येतो. यावरून ज्ञान या शब्दाला ज्ञानेश्वर किती महत्त्व देतात, हे आपल्या लक्षात येते. ज्ञान या शब्दाला महत्त्व देणे म्हणजेच शिक्षणाला आणि वैचारिक प्रगतीला महत्त्व देणे होय, असे मला वाटते. पंढरीचा विठोबा या लेखामध्ये लेखिका म्हणतात, ; आता माझ्या व्यक्तिगत भूमिकेत व पारंपरिक सामाजिक भूमिकेत एक सुसंवाद निर्माण झाला. वारकर्‍यांची परंपरा निराळ्या अर्थाने पटू लागली. सारे वारकरी वाङ्मय, लोककथा आणि मी यांच्यात लय लागली. यावरून अगदी त्या काळातील विद्याविभूषित म्हणजे एम.ए.झालेल्या दुर्गा भागवत यांनाही वारकरी संप्रदायाचा अभ्यास करावासा वाटला. त्यातून शिकण्यासारखे त्यांना खूप काही सापडले. एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान प्राप्त झाले, त्याचा अभ्यास केला तर त्याबद्दल एक आंतरिक ओढ निर्माण होते, असेही आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र या तीन राज्यांमध्ये भाषाभिन्नता असूनही त्यांची संस्कृती एक आहे. या तिन्ही भागांतील डोंगराळ ग्राम विभागातल्या गोप संस्कृतीमधून हे एकात्म स्फुरलेले आहे, असे जेव्हा लेखिका म्हणतात तेव्हा भारतीय लोकसंस्कृतीमध्ये प्रांत, भाषा आणि जात, धर्म या सर्वांपेक्षा वेगळ्या स्तरावर आध्यात्मिक शिक्षणाचे महत्त्व असून, त्या शिक्षणाची लय साधली गेली की, वरील भेदाभेद आपोआप नष्ट होतात आणि एकात्मतेची आणि समतेची गुढी उभारली जाते. जोगवा या लेखामधून दुर्गा भागवत यांनी जोगवा मागायला आलेल्या स्त्री-पुरुषाच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. त्यात एका ठिकाणी काय म्हणतात, संप्रदायाबद्दल वाचले होते ढीगभर, पण आज ते सत्य पुस्तकाबाहेर पडले नि त्या वेश्येच्या उंबरठ्यावर प्रकट झाले. यावरून आपण पुस्तकात वाचतो, पुस्तकातून ज्याचा अभ्यास करतो त्यापेक्षा प्रत्यक्षातील जनजीवन फार दाहक आणि अंगावर येणारे असू शकते. त्यामुळे पुस्तकी अभ्यासासोबत प्रत्यक्ष अनुभव त्यातही लोकानुभव जोडीला असला की, आपला अभ्यास पूर्ण होऊन आपल्याला संबंधित विषयाचे संपूर्ण शिक्षण मिळते, हेही लक्षात घ्यावे लागते.
द्वारकेचा राणा यात भागवत वाचताना मनाला मिळालेली शांतता, तसेच काही पुराणातून कृष्णजन्मातील सत्य यांचा अभ्यास दुर्गा भागवत यांनी मांडला आहे. पैसमधील बहुतेक लेखांमधून आध्यात्मिक शिक्षण, जीवनशिक्षण असे अनौपचारिक शिक्षणाचे संदर्भ आपल्याला भेटत राहतात. यमुना कालिंदी या लेखात कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे जगन्नाथाच्या करुण विलासाचे भाषांतर वाचले, तेव्हा त्या 12 ते 14 वर्षांच्या असतील असा संदर्भ त्यांनी सांगितला आहे. अर्थात, या वयातील वाचन हे आपली वाचन भूक भागवणारे ठरू शकते, त्यातून योग्य मथितार्थ मात्र पुरेसे ज्ञान प्राप्त झाल्यावरच काढता येतो, असे त्यांच्यावरील संदर्भातील विवेचन वाचताना वाटते.त्याचबरोबर जन्मापासून प्रत्येकाच्या मनात ज्ञानाची एक तहान असते ती अनुभवातून भागत जाते, अशा वाक्यातून नैनीच्या पुलावर या लेखात दुर्गा भागवत यांनी पूरक संदर्भ दिलेले आहेत. डोंगरमाथ्यावर हा एक अत्यंत महत्त्वाचा लेख पैस या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो, ज्यात जुन्या पुस्तकातली धूळ जशी निर्जीव वाटते, असे एक वाक्य लेखिकेने वापरले आहे, ज्यात पुस्तके उघडून वाचली जात नसते, तर त्याचे साचलेपण हे निर्जीव असल्यासारखे असते, असा सूचक अर्थ निघतो. याच लेखात गौतम बुद्धाने एका तरुण स्त्रीच्या प्रेतावरचे वस्त्र मागून ते गुडघ्याभोवती गुंडाळले आणि त्यांनी मृत्यूवर विचार केला, त्यातून त्यांनी मृत्युंजय तत्त्वज्ञान मिळवले. त्यांच्या एका शिष्यानेही एका तरुणीचे प्रेत स्मशानात पाहिले, स्मशान रक्षकाला त्याने पैसे दिले व प्रेताजवळ बसून ध्यान करण्याची अनुज्ञा मिळवली. ते प्रेत सडेपर्यंत त्याच्या सार्‍या अवस्था त्याने पाहिल्या आणि त्याचे मन वैराग्यशील बनले.
अशा संदर्भाचे विवेचन करून दुर्गा भागवत यांनी गौतम बुद्ध किंवा त्यांचे शिष्य जीवनाचा आणि मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी काय करत होते, हे सांगून इतक्या प्रखर ज्ञान लालसेमुळेच त्यांनी आपली ध्येये साकार केली आहेत आणि त्यामुळेच आजही बौद्ध तत्त्वनाज्ञाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आसन्नमरण काळी राणी या लेखात सुद्धा बुद्धाच्या शिकवणीबाबत लेखिका गौरवपूर्व वाक्य लिहिताना म्हणतात, काय स्थित्यंतर घडवले बुद्धाने? कोणते नवचैतन्य त्याने नरनारींना दिले? कोणते सत्य त्याने लोकांना सांगितले की, ज्याच्यामुळे घरादाराचा त्याग करून सुखी संसारी माणसेदेखील संन्यासी जीवन अंगीकारायला तयार झाली? बुद्धाचा सम्यक मार्ग हा मानवी जीवन चरितार्थ सूचक असा मध्यम मार्ग आहे, असे दुर्गा भागवत त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या काही लेखांतून सातत्याने जाणवत राहते. औपचारिक म्हणजे शालेय शिक्षणाचा विचार करताना ख्रिस्त संगत या लेखांमध्ये दुर्गा भागवत ख्रिस्ती शाळेमध्ये शिकायच्या आणि त्या ख्रिस्ती शाळेतल्या प्राथमिक शिस्त त्यांच्या अंगवळणी पडली होती, असे त्या सांगतात. यावरून शालेय जीवनातील शिस्त ही माणसाच्या कायमस्वरूपी लक्षात राहते त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या दुर्गा भागवतांना शाळेत शिकत असताना येशूबाबत माहिती दिली जात असे. वर्गात अभ्यास चालला असताना दुर्लक्ष करणे, कॉपी आजोबांकडून लिहून घेणे, अशा बाबींना पाप समजून हे विद्यार्थी शाळेच्या प्रार्थनेत या पापांबद्दल क्षमा मागत. यातून शालेय शिक्षणासोबत संस्कार शिक्षणाचा परिपाठ देणे, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असताना किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. ख्रिस्ती शाळेत ख्रिस्त धर्माचा संस्कार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जात असे. त्यामागे विद्यार्थ्यांच्या मनात त्या धर्माचे महत्त्व वाढावे, असा उद्देश इंग्रजांच्या मनात असे. मात्र, येशूच्या प्रेरकत्वापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरकत्व अधिक होते, अशी जाणीव लेखिकेला फार पूर्वी झालेली होती. औपचारिक शिक्षणाच्या मार्गक्रमाला कधीकधी अनाठायी अट्टहासामध्ये कसे होते याबाबतचा एक प्रसंग नैनीच्या पुलावर या लेखात एका प्रसंगाच्या वर्णनात दिसून येते. मंदिरात शिक्षण असलेले आणि अशिक्षित असलेले असा काही भेदभाव नसतो. मात्र, तेथेही काही शिकलेल्या लोकांचा अहंकार आडवा येतो आणि एक भाविक म्हणतो, शिकलेल्यांना वाटतं की, आपण सारं मिळवलंय, पण वेळ आली की, सारे मग देवाच्याच आसर्‍यासाठी आकांत करतात; ज्या पद्धतीने मांडले आहे ते आजपर्यंत चालतच आलेले आहे. शिक्षण घेऊन देवाच्या समोर डोके टेकवणे, हा संस्काराचा भाग आहे हा बोध शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानामुळे ईश्वरीशक्तीचे प्रयोजन काय, असा निर्माण होणारा प्रश्न? अशा अनेक बाबी एकाच वेळी वरील प्रसंगातून अधोरेखित होतात.
लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या दुर्गा भागवतांनी व्यासपर्व या त्यांच्या आध्यात्मिक ललित लेखसंग्रहामधून महाभारत विषयावर सखोल चिंतन केले आहे. पैसमध्ये विठ्ठल, कृष्ण आणि बुद्ध यांच्यासोबत अहिल्याबाई होळकरसुद्धा आहेत. अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या लोकविलक्षण कार्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. त्यातही अगदी आजही अहिल्याबाई होळकरांचा शिवलिंग घेतलेला फोटो पाहून त्यांना धार्मिक व्यक्तिरेखा म्हणून मोठी ओळख देताना त्यांच्या इतर सामाजिक कार्याकडे इतिहास अनेकदा दुर्लक्ष करतो आणि अहिल्याबाईंना धर्मरक्षक ही ओळख गडद करून देतो, असे दुर्गा भागवत म्हणतात.
व्यासपर्वच्या प्रचंड यशानंतर आणि चर्चेनंतर पैसमध्ये दुर्गा भागवत कुठेही महाभारतावर किंवा महाभारतातील पात्रांवर भाष्य करत नाहीत. द्वारकेचा उल्लेख येतो त्यामुळे कृष्णही भेटतो. मात्र, हा कृष्ण आपल्याला व्यासपर्वमध्ये कधीही दिसलेला नसतो. यातून दुर्गा भागवत यांचा प्रचंड अभ्यास आणि व्यासंग दिसून येतो. एकंदरीत पैस या आध्यात्मिक ललित लेखसंग्रहामध्ये बुद्ध तत्त्वज्ञान, बुद्धलेण्या, द्वारका, विठोबा अशा बाबींवर भाष्य करताना त्या अनुषंगाने आध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवन शिक्षणाचे सार दुर्गाबाईंनी मांडले आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

6 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

6 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

6 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

6 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

6 hours ago

साद देती सह्याद्रीशिखरे!

गड-किल्ले, डोंगरदर्‍या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो…

6 hours ago